जुन्या कमळांसह `सदाशिव` हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!
राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...!
कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : दिवसातून दोन पाच मंडळांच्या आरत्या, काही घरगुती गणपतींचे दर्शन घेऊन पिंपरी चिंचवड कमळ प्रांताचे अध्यक्ष आणि चिंचवडचे राजे लक्ष्मण अर्थात शंकर थकून भागून चंद्ररंग महालात येऊन बसले. काही कार्यकर्ते, काही उजवे डावे हात आजूबाजूला होतेच...!
उकडीच्या मोदकांची चव कार्यकर्त्यांच्या जीभेवर रेंगाळत होती, त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...!
कसल्या तरी विचारांनी त्यांचा चेहरा चिंताग्रस्त होता..! राजा चिंताग्रस्त असताना डावे उजवे हात आणि कार्यकर्ते मात्र हास्य विनोदात रंगले होते...! आपण चिंताग्रस्त असताना कार्यकर्ते हसतात याचा सात्विक संताप लक्ष्मणाला आला आणि त्यांनी चढ्या आवाजात शांत बसण्याचा आदेश त्यांना दिला.
तुपाच्या शिऱ्याचं आणि मोदकाचे समाधान असलेले कार्यकर्त्यांचे चेहरे त्याबरोबर कारले खाल्यासारखे झाले...! एवढ्या मंगलमय वातावरणात राजांना काय झाले असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असतानाच कोणी तरी मिठाईची ताटे घेऊन चंद्ररंग महालात शिरले.
आहो कमळ प्रांतातल्या आणखी एका निष्ठवंताला 'पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकारण'चे अध्यक्षपद मिळाले, त्याचा सोहळा गेली दहा बारा दिवस शहरात सुरु आहे, दररोज वर्तमान पत्रात त्याचे वृत्त येतंय, आणि दररोज कोणी ना कोणी तरी महालात मिठाई पाठवत आहे, याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली आणि राजे लक्ष्मण का चिंताग्रस्त आहेत, याचे कोडे कार्यकर्त्यांना उलगडले.
तिकडे प्राधिकरणाच्या मुख्यालयात बसलेल्या खाडेच्या 'सदाशिव' ला आणखी एक पुष्पगुच्छ मिळाला आणि आजूबाजूला बसलेल्या जुन्या कमळाच्या निष्ठावतांकडे त्यांनी पाहिले आणि जुन्या कमळांसह सदाशिव हसला....!
भोसरीचे राजे राम अर्थात महेश यांची अवस्था ही काही वेगळी नव्हती.. त्यांच्या चेहऱ्यावर ही ना मोदकाचे ना तुपातल्या शिऱ्याचे समाधान होते. डाव फसला कुठे याचा विचार त्यांना पडला होता.
लक्ष्मणाशी प्रचंड वाद आहे, असा आभास करून प्रसंगी स्वतः च्या पाठिराख्यांसह संपूर्ण शहराला आपण वेड्याच काढत होतो. परंतु आता हे घडले कसे, हा विचार रामाला स्वस्थ बसून देत नव्हता.
कोणाच्या ही पाया पडून समोरच्याला नामोहरम करण्याची कला असलेल्या चाणक्य कार्तिकला ही काय करावे हे कळत नव्हते. आपण एवढे चाणक्य, तरी ही सदाशिवाने प्राधिकरणाचे प्रमुखपद खेचून आणले. कसा हा प्रश्न राजा राम आणि चाणक्याला सतावू लागला. इकडे 'सदाशिव'ला मुंबईतून शुभेच्छा देणारा आणखी एक दूरध्वनी आला आणि पुन्हा जुन्या कमळांसह सदाशिव हसला...!
आतापर्यंत पिंपरी चिंचवड नगरीचे महापौर पद असो की तिजोरीच्या चाव्या असणारी स्थायी समिती असो, आपल्या मर्जी शिवाय तिथे कोणीच बसू शकले नाही आणि शहरातले प्राधिकरणाचे अध्यक्षपद सदाशिवला गेले कसे, हा विचार राम आणि लक्ष्मणाला स्वस्त बसू देईना. हे पद सदाशिवला मिळेल, हे कळल्यानंतर आपण तिथे आता नाशिकला असलेल्या 'तुकाराम' यांची नियुक्ती करून घेतली.
पण दुर्दैव त्यांनी पदभार न स्वीकारताच नाशिक गाठले. परत निवडीबाबत चर्चा झाली तेंव्हा आपण वाद घातला.. पण सदाशिवने बाजी मारलीच हा विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता.. तेंव्हा अखेर झालेल्या हानीची भरपाई करायची कशी, असा प्रश्न दोघांना पडला. अचानक कसले तरी तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले.
झालेली हानी भरून काढण्यासाठी शहरातील एका नेत्याच्या माध्यमातून आपण भरून काढू शकतो, हे त्यांना उमजले. आणि काही वेळातच शहरवासीय आणि पत्रकारांच्या मोबाईलवर एक संदेश येऊन धडकला. घड्याळ प्रांतातून कमळ प्रांतात आलेल्या "आझमभाई" वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राम लक्ष्मणाचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे...!
हा संदेश शहरात वाऱ्या सारखा फिरला...दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात राम लक्ष्मणाच्या बातम्या आल्या.. दोघे ही कोणत्या तरी मंडळाच्या आरती मध्ये होते.. कार्यकर्त्यांनी मोहीम फत्ते झाल्याची वार्ता कानात सांगितली..आणि पुन्हा उकडीच्या मोदकाची आणि तुपातल्या शिऱ्याची चव राम लक्ष्मणाच्या जीभेवर रेंगाळू लागली आणि चेहऱ्यावर समाधान दिसू लागले..!
तिकडे प्राधिकरणात 'सदाशिव' च्या अध्यक्ष पदाच्या आनंदाचा सोहळा संपला.. सदाशिव, घड्याळ प्रांतातून कमळ प्रांतात आलेल्या "आझमभाई" वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राम लक्ष्मणाचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे ही बातमी वर्तमान पत्रात वाचत होता.
आता काय कोणाला काही ही मिळो.. आपल्याला प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळाले, ग्रामविकासासाठी कटिबद्ध असलेल्या पंकजा ताईने शब्द पाळला हा विचार त्यांच्या मनात आला, मुख्यमंत्र्यांनी ही त्याला मान दिला हा विचार सदाशिव च्या मनात आला तेंव्हा पुन्हा एकदा जुन्या कमळांसह सदाशिव हसला...!
(राम - महेश लांडगे, आमदार, भाजप, लक्ष्मण - लक्ष्मण जगताप, आमदार शहराध्यक्ष भाजप, सदाशिव - सदाशिव खाडे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्राधिकरण, निष्ठावान भाजप कार्यकर्ता, आझमभाई - आझम पानसरे, नेते, भाजप यांचा या लेखातल्या व्यक्ती रेखांशी साधर्म्य वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही...! सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्ववभूमीवर काल्पनिक सोहळा...)
(वरील सर्व लेख, हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. कोणताही ब्लॉग हा लेखकाचं वैयक्तिक मत असतं, या मताशी झी मीडिया सहमत आहेच असं नाही. किंवा झी मीडियाचा या मताशी कोणताही संबंध नाही.)