कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  कधी गुंडांवर झाडे फेकून तर कधी वेषांतर करत आरोपींना पकडणे तर कधी स्वतःच वेषांतर करत पोलिस स्थानकाचे कामकाज कसे चाललंय याचा आढावा घेणे, अशा असंख्य आव्हानांमधून पोलाद पुरुष अर्थात आयर्न मॅन 'कृष्ण' सरांनी पिंपरी चिंचवड परगण्यामधल्या आपल्या कारकिर्दीचा 'प्रकाश' पिंपरी चिंचवड पोलिस मुख्यालयावर पाडला. पण काही नतद्रष्ट लोकांनी षडयंत्र करत त्यांना मुंबई धाडण्याचे काम केले. त्यांच्या पराक्रमाच्या वार्तापेक्षा ते गेल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा लेखा जोखा मांडणारा एक खलिता सोशल मीडिया नामक अंतरजाळ्यात फिरत राहिल्याने त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना प्रचंड दु:ख झालं. पण त्या खलित्याचा आणि 'कृष्ण" पराक्रमाचा ही 'प्रकाश' पिंपरी चिंचवड परगण्यातील जनता आता विसरून गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

    कायम प्रसिद्धी माध्यमात चमकणारे 'कृष्ण' सर पिंपरी चिंचवड पोलिस मुख्यालय सोडून गेल्यानंतर मुख्यालयाच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी 'अंक उष' यांच्यावर पडली. प्रसिद्धी मध्यमरूपी जंजाजाळातून दूर राहिल्याने हे 'अंक' उष काही तरी करतील अशी अपेक्षा परगण्यातील जनतेने बाळगली. पण शेवटी भाबडी जनताच ती...तीच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर कसं..!  प्रमुख म्हणून जनतेच्या मनात कसलीच प्रतिमा निर्माण न करू शकणाऱ्या या "अंक उष' सरांचा किमान त्यांच्या चौकी प्रमुखांवर वचक असेल अशी अपेक्षा होती. पण जनतेची ही अपेक्षा ही फोलच ठरली. 
  
   पिंपरी चिंचवड परगण्यातील एका कुख्यात गुंड जेल मधून बाहेर आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी परगण्यात काय तो जल्लोष झाला..! दुचाक्या पिटाळत घोषणा करत या गाव गुंडाने परगण्यातील जनतेला वेठीस धरले...! पण दोन महिने झाले तरी ना 'अंक'उष सरांना, ना त्यांच्या चौकी प्रमुखांना त्याची खबरबात..! अखेर सोशल मिडिया नामक अंतरजाळात त्या गुंडाचा जल्लोष फिरू लागल्यावर सर्वांचे डोळे उघडले आणि तब्बल 60 दिवसानंतर त्याची दखल घेण्याची तसदी सर्वांना जाणवली...!


              दुसरीकडे परगण्यातील 'ते' उद्योग ही आता पूर्व पदावर येत असल्याचे परगण्यातील जनतेला जाणवू लागलेय...!  नदी काठी दूरवर दरवरळणार तो धुंद वास आता जनतेला जाणवू लागलाय..! आता गल्ली बोळाच्या कोपऱ्या कोपऱ्यात कल्याण, मिलन बाजार, टाईम लाईट असे शब्द ही परगण्यातील जनतेच्या कानावर पडत आकडे लागले असल्याचे पाहून जनता हवालदिल झालीय..!  दुसरीकडे 'अंक'उष यांच्या कडे गेल्यावर समस्येतून तोडगा निघेल या अपेक्षेने बाभडी जनता गेली तर त्यांच्या तोंडाला ही पानच पुसली जात आहेत..! दस्तुरखुद्द 'अंक'उष यांनी चौकी प्रमुखांना समस्या सोडवण्याचा खलिता धाडला तर त्याला थेट केराची टोपली दाखवली जात आहे...! त्यामुळं 'कृष्णा'चा 'प्रकाश' तर मावळला पण कायदा सुव्ययस्थेचा 'अंक' उष' ही अपयशी झाल्याची भावना जनतेच्या मनात रेंगाळत असतानाच आपल्या नशिबी हेच या विचाराने जनता निद्रिस्त झाली आणि तिकडं पोलिस मुख्यालय ओस पडलं...!