रवि पत्की : राफेल नदालने 14 वी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.  मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत  18 वेळेस भाग घेऊन 14 वेळा जिंकणं खायची गोष्ट नाही. क्ले कोर्ट तो खिशात घालून फिरतो. त्याच्या झोपण्याच्या पलंगाला त्याने रोलँड गॅरॉस असे नाव दिल्याचे ऐकतो. (rafael nadal won the french open title for the 14th time know his success story ravi patki blog)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्ले कोर्टवर चेंडू संथ येतो. विलक्षण पॉवर गेम आणि स्टॅमिना लागतो अशा कोर्टवर.अशा संथ कोर्टवर टॉपस्पिन हे त्याचे प्रमुख अस्त्र आहे. त्याचा टॉपस्पिन चेंडूला बाऊन्स देतो आणि चेंडू खोल बेसलाइनपाशी जातो. प्रतिस्पर्धी तो बाऊन्स कव्हर करताना मेटाकुटीला येतो. मग प्रतिस्पर्ध्याच्या कमकुवत रिटर्नवर नदाल ड्रॉप शॉट किंवा सखोल व्हॉली खेळून पॉईंट वसूल करतो.


दोन्ही हाताच्या बॅकहँडची नदालची शक्ती तुफान आहे.ही सर्व क्ले कोर्टवर लागणारी अस्त्रे त्याच्या भात्यात आहेत. त्याच्या 14 फ्रेंच ओपन अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात त्याला आत्तापर्यंत एकदाही पाच सेट पर्यंत झुंजावे लागले नाही. फ्रेंच ओपनमध्ये 2005 पासून पठठ्याने 112 सामने जिंकून फक्त तीन हरले आहेत.  सॉडरलिंग विरुद्ध 2009 मध्ये, 2015 आणि 2021 मध्ये जोकोविच विरुद्ध तो हरला होता. 


ग्रँड स्लॅम स्पर्धा 14 वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. टेनिसच्या खुल्या कालखंडात (open era) मार्टिनाने 9 वेळा विम्बल्डन, जोकोविचने 9 वेळा ऑस्ट्रेलियन,फेडरर 8 विम्बलडन, सेरेना विलीअम्स 7 वेळा ऑस्ट्रेलियन आणि 7वेळा विम्बलडन जिंकले आहे.


नदालने फ्रेंच ओपनमध्ये 2005 पासून 333 सेट्स जिंकून फक्त 34 हरले आहेत. त्याने 2008,2010,2017 आणि 2020 मध्ये एकही सेट न हरता फ्रेंच ओपन जिंकली होती. .क्ले कोर्टवरील त्याचे वर्चस्व बेफाम आहे.2005 ते 2007 मध्ये त्याने क्ले कोर्टवर सलग 81 सामने जिंकले होते.


बियॉन बॉर्गने 5 वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकल्यावर ते रेकॉर्ड कुणी मोडेल असं वाटले नव्हतं. बॉर्गने 5 वेळा विम्बलडन देखील जिंकून तो ऑल राउंड खेळाडू होता हे दाखवून दिलं होतं. 


नदालने 14 फ्रेंच जिंकून शिखर गाठले आहे. केव्हढी शाररिक आणि मानसिक तयारी असेल त्याची. टेनिसचा खेळ म्हणजे स्टॅमिनाचा कस लागतो. नुसतं एकदा सर्विस करून व्हॉली साठी नेटवर गेल्यावर कानातून धूर निघतो. अशा खेळात36 व्या वर्षी सगळ्यात demanding स्पर्धा जिंकायची म्हणजे काय विजिगिशु वृत्ती असेल. 


जिंकल्यावर पठ्ठा म्हणतो ताकद आणि फिटनेस राहिला तर मी पुन्हा येईन.पायाच्या दुखापतीने अनेक वर्षे सतावले असताना सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत तो GOAT(Greatest Of All Time)शर्यतीत टिकून आहे. 


फेडरर का जोकोविच का नदाल यात प्रत्येकाचे चाहते GOAT म्हणून आपल्या लाडक्या खेळाडूला मत देतील.तिघांनीही टेनिस मध्ये एव्हढे प्राप्त केले आहे की तिघांपैकी कुणी एक GOAT म्हणून निवडणे अवघड आहे. 


ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकदोन विजयाच्या फरकाने कुणी दुसऱ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होईल, असे वाटत नाही. तिघेही ग्रेट आहेत.बॉर्ग, कॉंनर्स, मॅकेनरो नंतर सॅमप्रस,ऍगसी यांनी टेनिस जगताला उच्च प्रतिस्पर्धेची मेजवानी दिली.फेडरर,जोकोविच,नदाल यांच्यातील प्रतिस्पर्धेने टेनिसला श्रीमंत तर केलेच आणि टेनिस शौकिनांचे अनुभवविश्व सुद्धा समृद्ध केले. सभ्य आणि चॅम्पियन  नदालने खेळत राहावे आणि जिंकत राहावे.