अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास : श्रीलंकेचं राष्ट्रगीत श्रीलंका नमो नमो नमो माता, हे भारतातही अनेकांना आवडतं. सिंहली आणि तामिळ भाषांत हे राष्ट्रगीत गायलं जातं. श्रीलंका या सुंदर देशाचं वर्णन त्यात आहे. माझी श्रीलंका मातृभूमी खूप सुंदर, श्रीमंत आणि कनवाळू आहे असं या राष्ट्रगीतात कवीने म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका सोडताना मनात अनेक भावना उचंबळून येत होत्या. हा दौरा केवळ पत्रकार म्हणून कोरडेपणाने करायचा नाही असं मी निघतानाच ठरवलं होतं. झी २४ तासचे मुख्य संपादक निलेश सरांनी, वेब टीमचे हेड राजीव कासले सरांनीही तसंच मला सांगितलं होतं. श्रीलंकेत रोजच्या घडामोडींव्यतिरिक्त काय काय चांगलं मिळेल ते सगळं मला हवं असं मला त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार मी काही देण्याचा प्रयत्न केला. 


कोलंबोच्या बंदरनायके विमानतळावर उतरलो पहाटे उगवत्या सूर्याच्या साक्षीने. ३५ हजार फुटांवरून मी सूर्यकिरणे श्रीलंकेआधी पाहिली. आता परत जाताना निघालोय मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन. आता ३५ हजार फुटांवरून मावळतीची किरण पाहतोय. श्रीलंकेने काय दिलं? प्रचंड अनुभव दिला.


मुंबईत पत्रकारिता केलीय. अगदी भारत पाकिस्तान एलओसीवर जाऊन मोठे चार दौरे केलेत. भारत चीन सीमेवरही रिपोर्टींग केलंय, पण परदेशात रिपोर्टींग करण्याची मजाच वेगळी. परदेश, विमानप्रवास, हॉटेल काय मज्जा आहे बुवा असं हे मुळीच नाही. ही प्रचंड तारेवरची कसरत होती. इंधन नसलेल्या श्रीलंकेत प्रचंड उन्हातून चालताना धावताना डी हायड्रेट झालो. पण धावत राहिलो. 


श्रीलंकेने खूप छान माणसांना भेटवलं. इथला सर्वसामान्य माणूस भारतीयांकडे मोठ्या अपेक्षेने, आत्मियतेने पाहतो, आमच्या झी समुहातलं झी तामिळ हे चॅनेल इथे प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे झीच्या बूमला इथ प्रचंड मान मिळतो. लोक थांबून थांबून भारतीय म्हणून बोलतात. श्रीलंकन सरकार कितीही चीनच्या कच्छपी लागलं असलं तरी सर्वसामान्य जनतेची नाळ भारताशी जुळलीय. 


कोलंबोत फिरणारे चिनी नागरिक सर्वसामान्य श्रीलंकन नागरिकांना आवडत नाहीत असं अनेकांनी बोलू दाखवलं. भारतीयांनी इथे यावं, श्रीलंकेत फिरावं अशी त्यांची  मनापासून इच्छा आहे. पंतप्रधान मोदी श्रीलंकेत अगदी तळागाळात माहिती आहेत. आपल्याला जयसूर्या आवडतो, संगकारा आवडतो हे ऐकून त्यांना बरं वाटतं. आपणही सोन्याची लंका, रावणाची लंका वगैरे म्हणून श्रीलंकेला आपल्याशी अगदी पुराण काळापासून बांधून ठेवलंय. 


इथले लोक सुशेगात आहेत. मस्त आयुष्य जगतात. शहरं खेडी टुमदार आहेत. सध्या तणावाच्या स्थितीमुळे जरा आंदोलनं, घोषणा, राडे होत आहेत पण लोक शांतताप्रिय आहेत. ५ ते ६ दिवस पेट्रोल पंपावर रांगेत उभे  आहेत पण हाणामाऱ्या, शिवीगाळ नाही. विरोधाचे सूर आहेत पण मनातच. रस्त्यावर त्यांचं जाहीर प्रदर्शन नाही. श्रीलंकेत लोक जनरली मजेत आयुष्य जगतात. स्वच्छता पाळतात, क्रिकेटवर स्थानिक कलांवर प्रेम करतात. 


श्रीलंकेत सुरू असलेल्या आंदोलनातही गंमती गंमती पाहायला मिळाल्या. टॅटू फुकटात काढून देत होते, पाणी वाटत होते, पत्रकारांना अदबीने माहिती देत होते. इथे आंदोलनात धर्मगुरूही होते. त्यांचं आंदोलनात काय काम असा प्रश्न मला पडला. तर ते आंदोलन हिंसक होऊ देत नाहीत असं समजलं. मौन आंदोलनात धर्मगुरू खरोखर लोकांना शांत ठेवत होते. आंदोलनात एकजण श्रीलंकेचे झेंडे वाटत होता. एकजण पडणार कचरा जमा करत होता. श्रीलंकेतले कलाकारही यात सहभागी झाले होते. 


हे आंदोलन अनोखं होतं, जनतेचा अंगार तर होताच, धग होतीच, तणाव होताच, पण उन्माद नव्हता. श्रीलंकेनं मन जिंकलं. सोन्याच्या लंकेने पुन्हा प्रगती करावी, राजकारण्यांनी स्वार्थ सोडावा असं मला वाटतं. जनतेला बदल हवाय, धोरणं, नीती यात बदल आता सरकारला करावा लागेल. 



श्रीलंकन सरकारला पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. भारतासारख्या खर्या मित्राची साथ श्रीलंकेने घ्यावी, भारताप्रमाणे ई व्हेईकल्स ही श्रीलंकेत काळाची गरज आहे. परदेशी उत्पादनांवर श्रीलंका प्रचंड अवलंबून आहे. भारतात एमएसएमसी उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतात, एमएसएमई हा भारतीय उद्योगांचा पाठीचा कणा म्हणायला हवा. श्रीलंकेत नेमकी याचीच कमतरता आहे. देश स्वयंपूर्ण करण्यात या एमएसएमईंचा मोठा वाटा असतो हे श्रीलंकेला फार लवकर समजून घ्यावं लागेल. शेती पद्धतीत अमुलाग्र बदल करावा लागेल. अन्नधान्याबाबत तरी स्वयंपूर्ण व्हावं लागेल. श्रीलंकेत उद्योगधंदे, हेवी इंडस्ट्री ही काळाची गरज आहे. 


पर्यटन व्यवसाय हा श्रीलंकेचा पाठीचा कणा. तो तगवून ठेवण्यासाठी श्रीलंकन प्रचंड झटतात. पण श्रीलंका फिरण्यासाठी महाग आहे. श्रीलंकेत हॉटेल्स महाग आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी हॉटेल्स, होम स्टे यांची संख्या प्रचंड वाढवावी लागेल. इतर कोणी जाऊ दे, एकटा भारतातला मध्यमवर्ग जरी श्रीलंकेकडे वळला ना तरी श्रीलंकेची गंगाजळी भरून जाईल. 


श्रीलंकेतले विचारवंत विचार करत आहेतच, जनता शहाणी आहे, सरकारनेही वेळीच शहाणं होण्याची गरज आहे.