बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई : वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, झिरो... नाव न जाहीर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
वयाच्या ५१ व्या वर्षी इंग्लिश विंग्लिश सारख्या चित्रपटातून तिने पुनरागमन केलं. घरी लाडू करुन विकण्याचा छोटासा व्यवसाय करणारी सर्वसाधारण गृहिणी...इंग्लिश बोलता न आल्यामुळे नवरा व मुलीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, प्रेमापेक्षाही आदराची अपेक्षा करणारी शशी गोडबोले श्रीदेवीशिवाय कुणी रंगवूच शकली नसती. चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला..श्रीदेवीच्या अभिनयाचे कौतुक झालं...हा चित्रपट ऑस्करसाठी परदेशी भाषा विभागासाठी शॉर्टलिस्टही करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ साली आलेला चित्रपट मॉम...बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी श्रीदेवीचा दमदार अभिनयाची मेजवानी तिच्या चाहत्यांना मिळाली. दोन्ही चित्रपटात नायक आणि नायिका सर्वकाही श्रीदेवी आणि श्रीदेवीच.....
श्रीदेवी खरंतर ८० च्या दशकातील सुपरस्टार... तेलगू, तामीळ, कन्नड चित्रपटात सत्ता काबीज करुन ती बॉलिवूड जिंकायला आली सज्ज झाली होती. एकहाती चित्रपट हिट करण्याचा ट्रेंड खरंतर श्रीदेवी ने आणला तो सुद्धा जितेंद्र, अमिताभ बच्चन , सनी देओल, विनोद खन्ना, रजनीकांत, कमल हसन असे तगडे अभिनेते समोर असताना.... श्रीदेवी खरी “हिम्मतवान “ ठरली. विद्या बालन कंगना रणौत, दिपीका पदुकोन यांना एकहाती सिनेमा हिट करताना आपण आत्ता पाहातोय. मात्र श्रीदेवी नावाचं वादळ तेव्हाच घोंगावत होतं..ते अगदी आत्तापर्यंत.हॉलीवूडचा स्टिवन स्पीलबर्गची ऑफर तिने नाकारली. ...अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी...पाच वर्षांसाठी तारखा फुल्ल असणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी...दिग्गज अभिनेत्यांना भितीपोटी जिच्यासोबत काम करायचं नव्हतं ती अभिनेत्री होती श्रीदेवी...अभिनय, सौंदर्य, नृत्य यांचा मिलाफ म्हणजे श्रीदेवी आणि फक्त श्रीदेवी
'ढाई किलो का हाथ किसी पर पडता है न तो आदमी उठता नही उठ जाता है'असा डायलॉग ठोकणा-या सनी देओलने चालबाजनंतर श्रीदेवीसोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला..श्रीदेवी समोर असल्यावर आम्हाला करण्यासारखे काही राहत नाही अशी खंत सनी देओलने त्याकाळात बोलून दाखवली होती. तर श्रीदेवीसोबत मी काम केलंय अशी शेखी मी माझ्या मुलांसमोर मिरवू शकेन म्हणून मला श्रीदेवीसोबत काम करायचं होतं अशी प्रांजल कबुली शाहरुख खानने दिली होती. चंद्रमुखी या चित्रपटाती रोल सलमानने श्रीदेवीसाठी लिहीला होता.
८० च्या त्या दशकात अमिताभ बच्चन यांची rival म्हणून श्रीदेवीचा उल्लेख केला गेला.अमिताभ बच्चन सरस की श्रीदेवी? हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच एका हिरोईनची तुलना हिरोसाबत केली जात होती. मिस्टर इंडिया चित्रपटाचा उल्लेख मिसेस इंडिया केला गेला. हा श्रीदेवीचा प्रभाव होता....बॉलिवूडच्या इतिहासात एक अध्याय रचला गेला होता...त्या अध्यायाचं नाव होतं श्रीदेवी!
कलेच दुसरं नाव श्रीदेवी..
श्रीदेवी म्हणजे कलेचं दुसरं नाव...अभिनय, नृत्य, सौंदर्य यांचा मिलाफ असणारी श्रीदेवी उत्कृष्ट चित्रकार आहे हे खरंतर कुणालाही न पटणारं...पण श्रीदेवीने आपली ही कला आपल्यापुरतीच ठेवली...फक्त तिच्यासाठी ....एकांतात रमणारी , मितभाषी असलेली श्रीदेवी पेंटिग रंगवण्यात तासनतास गढून जाते हे अनेकांना माहित नाही...पण एका शोमध्ये सलमान खानने काही वर्षांपुर्वी हे गुपित उघड केलं आणि श्रीदेवीमधील आणखी एका “कला”कार तिच्या चाहत्यांना कळली. तिच्या चित्रातही दिसतात ती तिची आवडती व्यक्तीमत्वं... स्त्री...कधी कणखर तर कधी आभासी स्त्री ...तर कधी असतो तिचा देव...मायकेल जॅक्सन ...
श्रीदेवी आठवड्यातील सुमारे १० तास ती या कलेला देते...हा कला फक्त तिच्यासाठी जोपासलेली...म्हणून एवढी सुंदरर पेंटिंग साकारुनही तिला ती विकायची नाहीत की ती प्रदर्शनात मांडायचीही नाहीत.तिच्यासाठी ती अमूल्य आहेत...श्रीदेवीने काढलेली पेंटिग म्हणून ती लाखो रुपयांना हातोहात विकलीही जातील पण श्रीदेवीला ती विकण्यात रस नव्हता.तीला तशा ऑफरही आल्या पण तिनं नाकारल्या.
पण श्रीदेवीने धरलेला प्रत्येक ठेका चाहत्यांना घायाळ करतो.हिम्मतवाला मधील नैनो में सपना....म्हणणा-या श्रीदेवीने प्रेक्षकांना घायाळ केलं...याच गाण्यामुळे तिला बॉलिवूडनं स्विकारलं...नृत्यात पारंगत असणारी श्रीदेवीने कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले नाही...श्रीदेवी ही मायकेल जॅक्सनची निस्सीम चाहती...मी त्याची पुजा करते असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. इंग्लिश विंग्लिश चित्रपटात तर त्याची झलकही पाहायला मिळाली होती. तिची गाणी म्हणजे वेड लावणारी...मिस्टर इंडियातील कांटे नही कटते,हवाहवाई , चांदनी , लम्हे, चालबाज, ही गाणी आजही आयकॉनिक आहेत.
श्रीदेवी अनेक चित्रपटात गायली देखील आहे...चांदणी, सद्मासह एका तेलगू चित्रपटात तिने काही ओळी गायल्या आहेत. लहानपणापासून अभिनयाची उत्कृष्ट जाण असलेल्या श्रीदेवीने तिच्या प्रत्येक कलेवर निस्सिम प्रेम केलं..ती कला जगली..
श्रीदेवी आणि साडी
अंगभर साडी परिधान करुनही रसिकांना घायाळ करता येतं हा ट्रेण्ड श्रीदेवीचा..'मिस्टर इंडिया'तील 'कांटे नही कटते...'हे गाणं याचं जिवंत उदाहरण...बंदी घालण्याची मागणी व्हावी एवढं हे गाणं हिट ठरलं...आणि बॉलिवूडमध्ये श्रीदेवीप्रमाणे हिट झाली शिफॉन साडी...
दाक्षिणात्य शरीरयष्टी असलेल्या श्रीदेवीचं सौंदर्य साडीमध्ये अत्यंत खुलायचं...ऑन स्क्रिन असो की ऑफ स्क्रिन श्रीदेवी साडीमध्ये अगदी सहजपणे वावरायची...पिवळ्या रंगाच्या शिफॉन साडीतील चांदनीमधील श्रीदेवी म्हणूनच आजही रसिकांना भुरळ पाडते.... जानबाज चित्रपटातील 'हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी में..' हे गाणं अजरामर ठरलं ते श्रीदेवी मुळे. फिरोज खानला ती एका गाण्यापुरती का होईना चित्रपटात हवी होती....श्रीदेवीने तो विश्वास सार्थ ठरवला..
शिफॉन साडीतील मादक नायिका ते 'इंग्लिश विंग्लिश'मधील मराठमोळी गृहिणी...स्त्रीदेवीच्या अभिनयाइतक्यात तिच्या साड्यांमधून या व्यक्तीरेखा जिवंत झाल्या...इंग्लिश विंग्लिशमध्ये एकही मराठी संवाद न बोलता तिच्या देहबोलीतून आणि तिच्या साड्यांमधून तीनं मराठीपण दाखवलं...तिच्या साध्या साड्यांमुळे अनेक गृहिणींनी तिच्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं. महाराष्ट्रीन पैठणी साडीविषयी तीला विशेष प्रेम होतं.
सब्यासाची आणि मनिष मल्होत्रा हे तिचे आवडते डिझायनर आणि मित्रही ..खास श्रीदेवीसाठी साड्या डिझाईन व्हायच्या.. .कांजीवरम असो कि डिझायनंर साडी....श्रीदेवीमुळे त्या साडीला सौंदर्य लाभायचं...पद्मश्री पुरस्कार स्विकारताना श्रीदेवीने गुलाबी रंगाची भरजरी कांजीवरम साडी परिधान केली होती. लखनौमध्ये तर एका प्रदर्शनात श्रीदेवी साडीचाही ट्रेण्ड होता. चांदनीमधील तिच्या बांगड्यांचा आणि साड्यांचा ट्रेण्ड मार्केटमध्ये पाहायला मिळाला..
पांढरा हा श्रीदेवीचा आवडता रंग...अनेकदा साडी नेसली की डोक्यात भरगच्च पांढऱ्या मोगरांचे गजरे आलेच... तीच्या इच्छेप्रमाणे याच पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याचा सुवास मागे सोडून श्रीदेवीने चाहत्यांचा निरोप घेतला.
( लेखिका 'झी 24 तास'च्या Deputy Executive Producer आहेत.)
poonam.narvekar@zeemedia.esselgroup.com