सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : अडीच महिने होतील जवळपास रोजच वेगवेगळे विषय सुचतायत. लिहायला घेते आणि थोडं लिहून झालं की मी ब्लँक होते. लिहायची इच्छा होतं नाही किंवा मग पुढे काही सुचतं नाही. पण आज 12चं अँकरिंग करत असतानाच अचानक मोहन गेला असं कळलं आणि हात लिहिते झाले. असं मोहनं जाईल आणि मला लिहायला सुचेल हे योग्य वाटत नाहीये. पण तरीही मला लिहायचंय. तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी सांगायचंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहनचं जायचं वय नव्हतं पण तो गेला. त्याला भेटून आलेले सगळे सांगत होते त्याच्या चुकीमुळे त्याची तब्बेत बिघडली. असेल कदाचित त्यानं तब्बेतीकडे नीट लक्ष दिलं नाही. औषधं घेतली नसतील किंवा दुखणं अंगावर काढलं असेल. 7 फेब्रुवारीपासून तो कोमात होता. सकाळी ब्रेन हॅमरेज आणि आज तो गेला.


जवळपास महिनाभराची जीवन मरणाची झुंज. मरणाचा विजय. पण बायको, वडील दोन लहान मुलं सगळ्यांना सोडून तो गेला. त्याचं जाण्याचं वय नव्हतं तसं त्याचं आजारी पडण्याचं वयही नव्हतं. शरीराशी संवाद साधला असता. त्याचं शरीर त्याला काय सांगतंय त्याकडे त्यानं लक्ष दिलं असतं तर कदाचित तो आज त्याच्या ४-५ वर्षाच्या मुलाला मांडीवर खेळवत असता. मुलीचा अभ्यास घेत असता. बायकोच्या हातचं जेवला असता आणि उतार वयातल्या वडिलांना आधार देताना दिसला असता. 


लतादीदी गेल्या त्या दिवशी रात्री ऑफिसमधून घरी जाताना मी वृषाली, कल्याणी आणि मोहन लिफ्टमध्ये सोबत होतो, आणि सात तारखेला ऑफिसला आले तर दुपारी मोहन सिरियस आहे असं कळलं. माझं मन थेट लिफ्टमध्ये गेलं. रात्री आम्ही मारलेल्या गप्पा आठवल्या. असं वाटलं रात्रीच कळलं असतं की ही शेवटची भेट आहे तर आपण काय बोललो असतो मोहनशी... पण असं थोडीच असतं. धडधाकट चालत्या बोलत्या माणसाला थोडीच काही होतं... असं आपण सतत स्वत:ला समजावत असतो. असं काही कळलं असतं आधी तर मग आपण किती प्रयत्न केले असते ना माणसाला वाचवण्याचे... तसेही मोहनला वाचवण्याचे प्रयत्न सगळ्यांनी केले. पण त्याला जायचंच होतं. त्याचा बायको मुलांसोबतचा वडिलांसोबतचा, आमच्यासोबतचा वाटा संपला होता. 


त्याच्या बायकोशी बोलले तेव्हा तिचं सतत एकच वाक्य 'ते एकदा का शुद्धीवर आले ना की मगच मला बरं वाटेल. मग मी जेऊ शकेल. माझी इच्छा नाही होत जेवायची.' सुमेश म्हणालेला 'ती जेवतच नाहीये. ज्युस, चहा काही आणून दिला तर तेही थोडंसं घेत. असं कसं चालेल?' तिची कशीबशी समजूत काढत होते सगळेच.


मला ती म्हणालेली 'मुलीला कळतं ती काही विचारत नाही पण मुलगा विचारतो पप्पा कधी येणार घरी...? मी सांगते बाहेर गेलेयत, येतील. लहान आहे ना तो त्याला नाही कळत...' आता काय सांगेल ती त्याला, या विचारानेच मन भरून येतंय. त्या लहानग्याचं तर हे कळण्याचंही वय नाही. त्याला फक्त बापाच्या फोटोला हार दिसेल... हार चढला म्हणजे आपला बाप देव झाला असं काहीसं वाटेल. तसंही आपण सांगतोच ना देवाघरी गेले. त्याचीही तशीच समजूत काढतील. पण मोहनच्या बाबांचं काय?


कोरोना काळात अर्धांगिनी गमावली आणि वर्षा दीडवर्षात कर्ताधर्ता मुलगा. ज्या वयात निवांत व्हावं त्या काळात पुन्हा मुलाच्या कुटुंबाची धुरा खांद्यावर घ्यायची. थकल्या खांद्यांना समजवायचं अजून थोडं काम कर लेकराची लेकरं वाढवायचीयत. एकदा त्यांचं सगळं मार्गी लागलं की मग कर आराम. पण ही वेळ का यावी त्या बापावर...? मोहनचं जाणं यात त्या बापाची काय चूक...?


खरी चूक तर मोहनचीच.... हो मोहनच चुकला! 


मी नेहमी म्हणते तुमचं शरीर तुमच्याशी बोलत असतं. मन बोलतं ना त्यापेक्षा जास्त शरीर बोलत असतं. तुम्ही लक्ष देत नाही. गृहित धरता शरीराला. हट्टीपणा करता, शरीराचं ऐकत नाही. जरा पाय दुखला की मार स्प्रे. घे पेनकिलर आणि लाग कामाला... छातीत दुखलं की घे गोळी आणि लाग कामाला. आपल्या तब्बेतीच्या बाबतीत आपण निगेटिव्ह विचार करायला तयार नसतो, करुही नये निगेटिव्ह विचार, पण किमान शरीर काहीतरी सांगतंय त्याचा विचार करून डॉक्टरचा सल्ला घ्या.


गरज असेल तर आराम करा. पथ्य पाळा. जे जे म्हणून शक्य असेल ते करा कारण सीर सलामत तो पगडी पचास... पण नाही ना आपण कामावर गेलो नाही, तर जणू काही आभाळ कोसळणार आहे. माझ्या न जाण्यानं काम थांबणारय असं काहीसं आपलं वागणं... किंवा मग मला काय होतंय ही बेफिकरी...ही बेफिकरीच जास्त...हीच आपल्याला मरणाच्या जवळ नेते. किंवा मरणयातना भोगायला लावते. 


का आपण शरीराला गृहित धरतो...? त्याच्याकडे लक्ष द्यायला का नाकारतो...?थोडा व्यायाम केला तर काय मोठं बिघडणार आपलं...? थोडा जिभेवर ताबा मिळवला तर काय फरक पडणार...? आपल्यावर जबाबदारी असल्यावर तरी किमान काळजी घेणं अपेक्षित आहेच ना...? आपल्याला ताठ मानेनं जगायचं असतं. तसे संस्कारही आपल्यावर होतात. आपणही मुलांवर तेच संस्कार करतो. पण मान ताठ ठेवायची तर त्यासाठी शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे हे कुणी शिकवतचं नाही. म्हणून मग शरीरच त्यासाठी पुढाकार घेतं आणि माझ्याकडे लक्ष द्या, सांगतं. पण नाही आपल्याला काम करायचं असंत, करियर करायचं असतं फ्रेंड सर्कलसोबत एन्जॉय करायचं असतं, फॅमिलीला वेळ द्यायच्या नावाखाली तासनतास मोबाईलमध्ये डोकं खुपसायचं असतं. येवढं बिझी असतो ना आपण की व्यायामबियाम करायला वेळचं नसतो, आणि व्यायाम वगैर हे श्रीमंताचे नखरे असतात. त्यांच्या दिमतीला येवढे नोकरचाकर असतात त्यामुळे त्यांना वेळ असतो व्यायाम करायला. मला कुठुन वेळ...? हे असं बोलून आपण स्वत ला फसवतो, आणि  आपल्याला मिळालेल्या या शरीराचा अपमान करतो. 


मोहनसोबत 11वर्षांपूर्वी लोणावळ्यात पाऊसवाटा कार्यक्रमाच्या शूटला गेलेले. त्याच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ... तेव्हा मोहनच्या कामाचा वेग पाहिला. त्याच्या कामाची स्टाईल... चांगलंच शूट झालं पाहिजे असा अट्टाहास... म्हणून चालत्या गाडीत मागच्या बाजूला पालथा झोपून त्यानं खूप छान शॉट्स घेतलेले. रस्त्याच्या दोन्ही बाजुला हिरवीगार झाडं... पावसानं ओला झालेला काळाभोर निर्मनुष्य रस्ता... ते शॉट्स आज डोळ्यापुढे येतायत. त्याच रस्त्यावर आम्हाला सगळ्यांना सोडून मोहन वेगात निघून गेला. इतक्यातच कधीतरी माझ्या फेसबुक लाईव्हच्या वेळी मी आले पण कॅमे-यावर कुणीच नाही म्हणून नेहमीप्रमाणे अरे कोण आहे या लवकर म्हटलं. मनातल्या मनात ठरवलं प्रेक्षकांची माफी मागायची कारण आज फेसबुक लाईव्हला उशीर होणार. पण कसलं काय मोहन आला लाईव्हच्या मिनीटभर आधी...वेगात फ्रेम लावली लाईट सेट केले आणि बरोब्बर साडेआठला लाईव्ह सुरु... पुन्हा त्याच्या कामाचा वेग दिसला.


मोहनच्या निमित्तानं एकच सांगते शरीर सिग्नल देत असतं. लक्ष दया. शरीराशी बोला. त्याचं म्हणणं ऐका. खरंच खूप बिझी असाल तर मग बोलाच शरीराशी. तुमच्या शरीराशी बोलायला स्पेशल वेळ द्यायची गरज नसते. आंघोळ करताना, ब्रश करताना, टॉयलेटमध्ये असताना बोला ना शरीराशी. विचारा ना त्याला काय हवं नको ते. त्याची गरज आपणच भागवू शकतो. तुम्ही त्याचा गरजेला धावून जा बघा कसं ते तुमच्या मदतील धावून येतं की नाही... ठणठणीत राहण्यासाठी फार वेळ द्यायची गरज नसते. मनाच्या आरोग्यासाठी गोळ्या घेता, मेडिटेशन करता, गाणी ऐकता, शरीरासाठी थोडासा व्यायाम करा. हजारदा सांगतेय शरीराकडे लक्ष द्याच. सगळ्यांच्याच फोटोला हार लागणारय पण तो अकाली लागू नये याची काळजी तर आपण घेऊच शकतो.