महेश पवार, झी २४ तास - जेष्ठ अभिनेते रमेश देव गेल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं. तसं माझं आणि त्यांचं काही नातं नाही. २००२ साली चित्रपट बिट कव्हर करताना एक दोनदा त्यांची झालेली भेट. इतकाच काय तो त्याच्यांशी परिचय. त्या एक दोन भेटीत, मुलाखतीत त्यांच्याशी एक अनामिक नातं जुळलं, म्हणूनच मी म्हटलं, मला भेटलेला देव - रमेश देव...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट बिट कव्हर करणाऱ्यांमध्ये मी तसा नवखाच.. तरीही सेट वर जाणं. नव्या, जुन्या कलाकारांच्या मुलाखती घेणं यामुळं थोडी फार ओळख होत होती. नवखेपणाचा अनुभव घेत पुढे जात होतो. भूमिका कोणतीही असो त्यांचा अभिनय, संवाद शैली याचं जितकं मला आकर्षण होतं तितकंच ते प्रेक्षकानाही होतं. खलनायकी पात्र उभं करताना त्यांची डोळ्यांची तिरकी नजर तर कधी न विसरता येण्यासारखी. त्यांच्याबद्दल एक कुतूहल होतं. त्यामुळेच त्यांची भेट होताच मन उचंबळून आलं होतं. लहानपणापासून ज्यांचे सिनेमा पाहत होतो. तो देव साक्षात समोर बसला होता. रमेश देव...


थोडं वय झालं होतं तरी अभिनयाची उर्मी काही स्वस्थ बसू देत नव्हती. नाटक, सिनेमात काम करणं सुरुच होतं. "घरीच बसलो तर या देहाचं (देवाचं) काही खरं नाही; वयोमानानुसार आता फार काम झेपत नाही. डायलॉग विसरायला होतात. पण, त्यावरही एक शक्कल काढलीय. शूट सुरु असताना जो सिन आहे त्याचे डायलॉग हातावर लिहून घेतो. मध्येच डायलॉग विसरलो तर अभिनय करता करता हातावर लिहिलेलं पाहायचं आणि आपलं काम पुढे सुरु ठेवायचं."


वयाची पासष्ठी उलटली होती. पण, कल्पना सुचणं काही कमी झालं नव्हतं. अर्थात ही अनुभवाची शिदोरी होती. अभिनय क्षमतेसोबतच वक्तशीरपणा आणि स्वभाव हे ही त्यांच्या यशस्वी होण्याचं महत्त्वाच कारण होतं. "दिग्दर्शकांनी दिलेल्या सूचना पाळणं, त्यांना अपेक्षित असलेला अभिनय करणं, मुळात जी भूमिका आपल्या वाट्याला आली आहे. त्या भूमिकेशी समरस होणं, त्यातले बारकावे समजून घेणं यासारख्या काही गोष्टी स्वतः समजून घेतल्या. त्यामुळेच नवे चित्रपट मिळत होते आणि वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेनुसार अभिनय केला." असं त्यांनी सांगितलं होतं.


पत्रकारितेत असताना अनेक व्यक्ती भेटत असतात. काही मुलाखतीच्या निमित्तानं तर काही अन्य कारणानं. मात्र, त्यातील काही ठराविक जणं लक्षात रहातात. त्यांचे बोल मनावर गोंदले जातात. हृदयाच्या एका कोपऱ्यात त्यांची जागा बनवतात. रमेश देव हे त्यापैकीच एक... रमेशकाका देव गेल्याची बातमी आली आणि त्या जुन्या आठवणी, त्यांच्यासोबत घालविलेले काही क्षण त्या कोपऱ्यातून पुन्हा उचंबळून बाहेर आले आणि आज लिहिते झाले...