सुवर्णा धानोरकर, मुंबई : आता पुन्हा मुंबईकरांचं स्पिरीट वगैरे म्हणू नका... अरे नाईलाज आहे हा त्यांचा. त्यांना जगायचंय. प्रत्येकाचं जगण्यावर प्रेम असतं. तसं प्रत्येक सामान्य मुंबईकराचंही आहे. त्यालाही जगायचंय आणि जगण्यासाठी संघर्षही करायचा आहे. तो तर सगळेच करतात म्हणाल. पण मुंबईकरांना थोडा जास्तच संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त असा पुलाखालून किंवा पुलावरून जातानाच करावा लागतो का असं नाही. त्यांच्या संघर्षाला सुरूवात होते, निवाऱ्यापासून. खिशात बक्कळ पैसा असेल तर हवं तिथे आणि हवं तसं घर मुंबईत मिळेल. कफल्लक असेल तर दहा बाय दहाची खोली आणि त्यात दोन- दोन, चार-चार संसार. मग कामासाठी संर्घष. काम मिळवण्यासाठी चपला झिजवाव्या लागणं आणि काम मिळालच तर उभं राहण्यासाठी लोकलच्या दरवाज्यात तरी जागा मिळेल का, यासाठीचा संघर्ष. जीवाच्या आकांतानं पळत धावत्या लोकलमध्ये चढणं. चढलात की सगळं व्यवस्थित असेल ना ?  कुठे काही संशय यावा असं काही नाही ना, ही धाकधूक. नशिबानं आज सगळ चांगलं झालंच तर हुश्श करत घरी पोहचता. पण घरी पोहचल्यावर तरी सुरक्षित असाल का याचा काहीच भरवसा नाही. हसता खेळता अचानक जीर्ण झालेल्या इमारतीचं छत कोसळेल आणि जीव जाईल. नाहीतर आग लागेल आणि होरपळाल. म्हणजे दिवसभर ज्या जगण्यासाठी संघर्ष केला तेच असं महागलं आणि दिवसाचा शेवट करता करता आयुष्याचाच शेवट झाला. हे तर आता रोजचच झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे पुल केव्हापासून पडायला लागले. आतापर्यंत त्यांनीच या मुंबईकराला साथ दिली होती. गरीबांना छत म्हणून निवारा दिला. पोटाची खळगी भरण्यासाठी फेरीवाल्याला २ फुटाची पथारी दिली. पावसात छत्री म्हणून पादचाऱ्याला आधार दिला. उन्हात थकलेल्याला सावली दिली. प्रेमी युगुलांना भेटण्यासाठी दोन निवांत क्षण दिले. मग आताच असं काय झालं या पुलांना, का ते वैरी झालेत मुंबईकराचे ? का रे बाबा तुही असा रुसतोस आणि अंगावर पडतोस ? तुझ्यावरही आता विश्वास ठेऊ नये का आम्ही? 


तुझीही चूक नाही म्हणा. किती गृहित धरावं आम्ही तुला... आम्हा मुंबईकरांना सगळेच गृहित धरत आलेत. राज्यकर्ते काय किंवा आणखी कुणी काय... तिच सवय आम्हालाही लागली बहुदा. आम्हीही तुला गृहीतच धरलं. तुझ्यावर किती ओझं लादलं. आम्ही दंगलीनं हादरलो, आम्ही बॉम्बस्फोटानं हादरलो, आम्ही महापुरानं हादरलो, आम्ही दहशतवादी हल्ल्यानं हादरलो, चेंगराचेंगरीनं हादरलो आणि आम्ही आगीनंही हादरलो. तरी आमची अगतिकता बघ आम्ही हे सगळं समोर घडत असताना क्षणभर थांबलो आणि तोंडानं चक करण्याइतपत माणुसकी दाखवून पुढे गेलो. कारण दु:ख करून फायदा काय. शेवटी पोट आहे आम्हाला. मग भूकेची जाणीव होणार नाही का म्हणून तर रक्ताचे सडे पाहूनही आम्ही कोऱ्या चेहऱ्यानं कामाला लागलो. आहे रे मन आम्हालाही. होतं दु:ख. पण नाही दाखवू शकत.


घड्याळातला सेकंद काटा मुंबईकरांइतका कुणासाठी महत्त्वाचा नाही. सेकंद सेकंदानं उशीर झाला की लोकल सुटते. ऑफिस, घर वेळेत कसं गाठणार म्हणून मग आम्ही पळतो. इतके पळतो की आमच्या पायाखाली कुणी चिरडलं जातंय, बाजुला मोठा बॉम्बस्फोट होतोय की कोण दहशतवादी येऊन गोळ्या झाडतोय याचं दु:ख करायला वेळच राहत नाही हातात. आणि ही वेळ निसटत असताना कानावर पडतात तेच न आवडणारे शब्द, 'मुंबईकराचं स्पिरीट!' 


कसलं हो स्पिरीट? मुंबई बाहेर राहणाऱ्यांना कायम मुंबईकरांचं कौतुक वाटतं, हेवा वाटतो. का तर यांचं लाईफ खुप मस्त असतं. मुंबईकर लाईफ एन्जॉय करतो म्हणे, यांना रोज सेलिब्रेटी दिसतात म्हणे, कुठलीही फॅशन सर्वात आधी मुंबईकरांना मिळते, फिरायला छान समुद्रकिनारी जाता येतं, वाळूत खेळता येतं. पण वाळूत खेळता खेळता मुंबईकर या वाळूतच रुतत चाललाय. त्याचं जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय. कधी काय घडेल याचा नेम नाही. याक्षणाला हसता हसता पुलावर असेल तर पुल कोसळेल, लोकलमध्ये असेल तर बॉम्बस्फोट होईल नाहीतर चेंगराचेंगरीत जीव गुदमरेल आणि सगळं संपेल. सरकारकडून मदत मिळेल. पण या मदतीनं कुणाला आईबाप विकत घेता येणार आहेत ? शक्य आहे ? एखाद्या मुंबईकराचा बाप इथल्या एखाद्या दुर्घटनेत गेला तर चार पाच लाखात नवीन बाप त्याला मिळेल? तिथे येईल का स्पिरीट कामाला? एखाद्या कर्त्या व्यक्तिला बॉम्बस्फोटात अपंगत्व आलं तर सरकारच्या मदतीनं मिळेल त्याला खरेखुरे हात पाय? तिथे येईल स्पिरीट कामाला? 


बरं मायबाप पुलांनो, तुम्ही कोसळता ते आमच्यामुळेच. आमचं ओझं सहन करता करता मेटाकुटीला येता, जीव गुदमरतो आणि असहाय्य झालं की सारं उधळून लावता. पण तेव्हा तुम्ही फक्त आम्हा सामान्यांचाच जीव का घेता? तुमच्या ढिगाऱ्याखाली एखादा नेता किंवा जबाबादार अधिकारी हा येऊ देत नाही? हे दु:ख एकदा त्यांनाही सोसू दे, मुंबईकरांचं स्पिरीट काय म्हणतात ते त्यांनाही दाखवता येतं का बघु. त्यांना हे दु:ख सोसावं लागलं नाही ना म्हणून कदाचित त्यांनी मुंबईकराचं मरण स्वस्त करुन ठेवलं आहे. मुंबईतल्या प्रत्येक अप्रिय घटनेत बळी जातो तो सामान्य मुंबईकराचाच. ना नेत्याचा, ना अशा घटनांना जबबादार अधिकाऱ्याचा.


स्पिरीट दाखवायचं ते सामान्य मुंबईकरानंच. आता चार पाच दिवस सगळ्या पुलांकडे संशयानं पाहिलं जाईल. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. आणि पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागतील. ज्याचा कुणी अशा दुर्घटनांनमध्ये गेला. त्यालाही पोट आहे. दु:खी मन घेऊन तोही कामाला लागेल. कारण त्यालाही दाखवायचंय मुंबईकराचं स्पिरीट. चला आपणही दाखवू या स्पिरीट आणि सज्ज होऊया पुढच्या स्पिरीटसाठी...