TMKOC : मिनी इंडियाचं दर्शन घडवणाऱ्या `तारक मेहता का उल्टा चष्मा`ला 14 वर्ष पूर्ण
`तारक मेहता का उल्टा चष्मा` (TMKOC) या मालिकेच्या माध्यामातून उभ्या प्रेक्षक वर्गाचं खळखळून आणि भरभरुन मनोरंजन केलंय. लहानथोरांपासून आबाळवृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडत्या असलेल्या या मालिकेला आज 14 वर्ष पूर्ण झालीयेत.
संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : आज्ञाधारी आणि आदर्श असा मुलगा, बाप, नवरा आणि मेहुणा असलेला जेठालाल, लेखक आणि बायकोच्या डाएटला वैतगालेला तारक मेहता, शिस्तप्रिय शिक्षक भिडे, लहरी पण मैत्री निभावणारा सोढी, चिवट पण तितकाच खोडकर अय्यर, खादाड डॉक्टर हाथी, लग्नाळू पोपटलाल, मदतीला धावणारा अब्दूल, टप्पूसेना, महिला मंडळ, इंग्रजीने फिरकी घेणारे आणि कायम पगारवाढीची मागणी करणारे नट्टू काका आणि सरळसाधा बागा. या सर्वांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेच्या माध्यमातून उभ्या प्रेक्षक वर्गाचं खळखळून आणि भरभरुन मनोरंजन केलंय. लहानथोरांपासून आबाळवृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडत्या असलेल्या या मालिकेला आज 14 वर्ष पूर्ण झालीयेत. (tmkoc taarak mehta ka ooltah chashmah is completed 14 years know about all lead characters)
ही एक सोसायटी नसून मिनी भारत आहे. प्रत्येकाची वैयक्तिक समस्या आपली समस्या समजणारा व्यक्ती या सोसायटीत आपल्याला दिसून येतो. विनोद, व्यंग, संकट यासारख्या अनेक गोष्टींचा हसतखेळत, न डगमगता सामना कसा करायचा, याचा वस्तूपाठच जणू या मालिकेच्या प्रत्येक भागातून घालून दिला आहे. या मालिकेतील मोजक्या पण महत्त्वाच्या पात्रांबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
जेठा, दया, बापूजी, टप्पू आणि अवघड जागेचं दुखणं असलेला मेहुणा सुंदरलाल
जेठालाल चंपकलाल गडा हे या मालिकेतील मुख्यपात्र. जेठालालचे वडील आणि संपूर्ण सोसायटीचे चाचा चंपकलाल, बायको दया, एकुलता एक मुलगा टप्पू आणि एक पण दहाच्या तोडीचा असलेला 'पनौती' म्हणजेच मेहुणा सुंदरलाल. दररोजच्या जीवनात घडणाऱ्या समस्यांना वैतागलेला आणि गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक जेठालाल.
चंपकचाचा म्हणजे घरातील (सोसायटीतील) वरिष्ठ व्यक्ती. आपल्या अनुभवाने सोसायटीला सर्वांनाच सल्ला देणारे, टप्पूसेनेला संस्कार देणारे असे हे चंपकलाल. आपल्याला गुणी मुलगा, आज्ञधारी सून आणि हुश्शार नातू असल्याचं त्यांना कायम अभिमान.
आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये आपल्या मुलाने आणि सूनेनेही आपला असाच सांभाळ करावा, काहीही कमी पडू देऊ नये, असंच या चंपक चाचांना पाहून प्रत्येक समव्यस्क व्यक्तीला वाटेल.
जेठालालची बायको दया उर्फ गरबाक्वीन. कधीही कुठेही अगदी झोपेतही गरबा करण्यसाठी सज्ज असेलली आणि भोलीभाबडी अशी दया. आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आदरातिथ्य करणारी, एकसेएक पदार्थ करणारी अशी अन्नपूर्णा म्हणजे दया.
जेठालाल-दया यांचा एकमेव मुलगा आणि टप्पूसेनाप्रमुख टप्पु उर्फ टिपेंद्र. टप्पू कायम मस्तीत असतो. मात्र त्याला बापुजींच्या संस्कारांमुळे आपण काही चुकीचं तर करत नाही ना, याची जाण त्याला असते. मालिकेतील टप्पू आता मोठा जरी झाला असला तरी, त्याने शालेय जीवनात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आर्थिक निधी उभारून दुर्लक्षित घटाकांसाठी पैसा उभारला आहे. तो या सर्वाचं क्षेय बापूजींच्या शिकवणीला आणि संस्कारांना देतो.
जेठालालसाठी कायम डोकेदुखी असलेला त्याचा मेहुणा सुंदरलाल. गुजरातहून आपल्या बहिणीच्या सासरी (गोकुळधाम सोसायटी) टॅक्सीने येणारा हा सुंदरलाल. मालिकेच्या सुरुवातीपासूनच त्याने हे टॅक्सीभाडं जेठालाललाचं भरण्यास भाग पाडलंय. अशा या फुकट्या पण मेहुणा असल्याने जेठालाल आतापर्यंत टॅक्सी भाडं भरत आलाय. जेठालालने सुंदरपासून पिच्छा सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक टोटके केले, पण जेठालालला अद्याप तरी यश आलेलं नाही.
गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक असलेल्या जेठालालला दररोज काही न काही अडचणी येतच असतात. दुकानातील सहकारी मॅनेजर नट्टू काका आणि त्यांचा पुतण्या बागेश्वर उर्फ बागा या दोघांची जोडी म्हणजे क्या कहने.
वैयक्तिक आयुष्यात सर्वसामान्यांना ज्या प्रकारे सर्वांनाच वाटतं की हे सर्व माझ्यासोबतच का घडतंय, असंच नेमकं जेठालाललाही वाटतं. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात अडचणी येतात. या दरम्यान घडणाऱ्या विविध घटनांना अत्यंत उत्तमरित्या मालिकेत मांडण्यात आलंय.
एटीएम आणि फायर ब्रिगेड म्हणजेच सौ आणि श्री मेहता
गृहिणी अंजली आणि लेखक तारक मेहता. जेठालालचे फायर ब्रिगेड. जेठालालच्या वैयक्तिकआणि व्यवसायिक आयुष्यात अडचणी आल्यावर जेठालाल हा थेट फायर ब्रिगेड यांचं घर गाठतो. त्यांच्याकडे जेठालालच्या प्रत्येक समस्येवर उपाय असतो. जेठालालने म्हणून त्यांचं नाव 'फायर ब्रिगेड' असं ठेवलंय.
अंजली खाण्यापिण्याबाबत अत्यंत काटेकोर. आपला नवरा स्लिम फिट दिसावा यासाठी ती कारळ्याच्या सूपपासून ते नाना डिशेस तारकला देत असते. मात्र तारक याच डाएट फूडला वैतागलेला असतो. त्यामुळे तो बाहेर कुठे काही चमचमीत मिळतंय का, याच्या शोधात असतो, असंहे मिसेस आणि मिस्टर मेहता.
शिस्तप्रिय शिक्षक भिडे आणि सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी
शिक्षक म्हंटल्यावर आपल्यासमोर शिस्तप्रिय आणि वक्तशीर अशी प्रतिमा उभी राहते. या मालिकेत मंदार चांदवाडकर यांनी 'आत्मराम तुकाराम भिडे' हे पात्र भरभरुन साकारलंय. भिडे गुरुजींनी शिक्षकी पेक्षासह बिल्डिंगचा एकमेव सेक्रेटरी म्हणूनही अतिरिक्त कारभारही जबाबदारीने पार पाडतायेत. कॉलर टाईट करुन 'गोकुळधाम बिल्डिंगका एकमेव सेक्रेटरी' असं अभिमानाने सांगणाऱ्या आणि मिरवण्याच्या ट्रेडमार्क पद्धतीमुळेही भिडेचं वेगळेपण सिद्ध होतं.
टिपीकल कोकणी, पैशांबाबत कंजूष वाटत असला तरी काटकसरी, जितका समजूतदार तितकाच प्रेमळ, बायको माधवी आणि टप्पूसेनेतील एकमेव मुलगी सोनूवर जीव लावणारा, माधवीच्या गृहउद्योगात मदत करणारा, जेठालालवर मेनटेनंन्स आणि टप्पूच्या मस्तीमुळे कायम डाफरणारा, कायम संवादात 'अप्रतिम' आणि मराठी बोलणाऱ्या आत्मराम भिडेने या हिंदी मालिकेतूनही मराठी प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय.
गॅरेज मालक, मैत्रीसाठी काहीही करणारा आणि मुडी सोढी
प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक मित्र असतो, जो कायमच प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जातो. कायम विरोधी पार्टीतल्यांसोबत हमरीतुमरीसाठी तयार असतो. तसेच पिण्यासाठी 24 तास उत्सूक असतो. हे असं पात्र मालिकेतही आहे, त्याचं नाव सोढी.
पारशी बायको आणि एक मुलगा (गोगी) असं त्रिकोणी कुटुंब. सोढीचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे त्याच्या मालकीचं गॅरेज. कायमच पीजे मारणारा, विषय एक आणि मस्करीत दुसरंच काहीही बोलणारा, उत्साहात समोर दिसेल त्याच्या अंगावर धावून जाणारा, उचलून गोलगोल फिरवणारा, जितका प्रेमळ तितकाच आक्रमक आणि मारकुट्या असाही हरजीत सिंह सोढी हे पात्र गुरुचरण सिंह यांनी अफलातून साकारलंय.
मिसेस आणि मिस्टर डॉ हाथी आणि त्यांचा 'गोळ्या'
मिस्टर आणि मिसेस हाथी आणि त्यांचं एकमेव अपत्य म्हणजे गोळी. सतत, कायम आणि 24 तास फक्त नि फक्त खाण्याचाच विषय यांच्याकडे सुरु असतो. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाकडेही कायम खाण्याची मागणी करणारा, बायको कोमलकडेही विविध पदार्थ बनवून मागणारा आणि सही बात है म्हणणारे 'डॉक्टर हाथी'.
कवी कुमार आझाद यांनी सुरुवातीपासून काही मालिकेचा अपवाद वगळता मालिकेत 'डॉक्टर हाथी' ही व्यक्तिरेखा साकारली. त्यांच्या सहज आणि शांत स्वभावामुळे कायमच प्रेक्षकांना ते आपले वाटत आले. मात्र कवी कुमार आझाद यांनी 9 जुलै 2018 ला आपल्या सर्वांचा निरोप घेतला.
पोपटलाल
प्रत्येक गोष्टीत खोडा घालणारी आणि कायम नकारात्मक दृष्टीकोन असलेली व्यक्तीरेखा म्हणजे पोपटलाल. कायम छत्रीसोबत असलेला अवलिया. 'तुफान एक्सप्रेस' या वृत्तपत्राचा वरिष्ठ युवा पत्रकार आणि गोल्डन क्रू अवॉर्डने सन्मानित झालेला पोपटलाल आणि चंपक चाचाचा 'डिब्बा'.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वाईट गोष्टी समोर आणण्यासाठी धडपडणारा आणि लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला असा पोपटलाल. मालिकेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्याला लग्नासाठी मुलगी भेटली नाहीये.
या पोपटलालने आपल्या टु बीएकचे फ्लॅटच्या हॉलमध्ये शेरवाणी फ्रेम करुन लावलेलीय. लग्नाळू असल्याने दिसेल त्या मुलीच्या प्रेमात पडणारा हा पोपट. पैशांच्या बाबतीत अतिशय चिंगूस असं व्यक्तिमत्व. अनलिमिटेड कॉलिंगच्या युगातही मिसकॉल्ड देणारा आणि दिसेल त्याच्याशी पंगा घेणारा असा सिंगल फसली पोपटलाल.
मालिकेच्या 14 वर्षांच्या प्रवासात पोपटलालला लग्नाची संधी होती, मात्र बिछडे हुए दो दिलको मिलाने के लिए पोपटने आपल्या प्रेमाची आहुती दिलीय. असा हा कंजूष, कायम कॅन्सल कॅन्सलची टेप लावणारा पण तितकाच दिल दरिया टाईप व्यक्तिमत्व.
बबिता आणि अय्यर
दक्षिणेतील वातावरणामुळे नैसर्गिक रंग असलेला क्रिष्णन अय्यर आणि फॉरेनर वाटणारी पण बंगालमधील असणारी गोरीगोमटी बबिता. या पती पत्नीच्या जोडीच्या भन्नाट केमिस्ट्रीने आतापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सायंटिस्ट (जेठालालच्या भाषेत सायनिस्ट) असलेला अय्यर आणि गृहिणी पण अनेक एक्टीव्हीटी करणारी बबिता. ही जोडी प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे.
जेठालाल आणि बबिताची अफलातून केमिस्ट्री
लग्नानंतरही प्रत्येक पुरुषाच्या मनात त्याला आवडणारी एक महिला असते. त्याप्रमाणे जेठालाल बबितावर कायम लट्टू असतो. जेठालाल कायम बबिताला मदत करण्याची संधी तिच्यासोबत बोलण्याचं निमित्त शोधत असतो. मात्र ते अय्यरला आवडणारं नसतं. मात्र तरीही जेठालाल कायमच बबिताला मदत करण्यासाठी आग्रही असतो.
जेठालाल कायम अय्यरला फाट्यावर मारून बबिताशी काहीनकाही निमित्त शोधून गप्पा मारतो. बबिताच्या मनात तसं काहीच नसतं. मात्र जेठाजी आपल्यासोबत लगट करु पाहतायेत, हे तिला नक्कीच माहित असतं. हेच आपण आतापर्यंत अनेकदा पाहत आलोय. तसेच जेठालाल-बबिता यांच्या नात्यात मालिकेच्या इतिहासात अनेकदा दुरावा आणि गैरसमज पाहायला मिळालाय. मात्र मालिकेच्या परंपरेनुसार कायमच या गैरसमजुतीचा किंवा वादाचा शेवट गोड होत आलाय. भविष्यात मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं आणखी दुपप्टीनं मनोरंजन होत राहिल, हीच अपेक्षा.