जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारने या कठीण परिस्थिती अनेक कठोर निर्णय घेणे सुरू ठेवले आहेत. कारण परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. पण दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे, नाहीतर ताण राज्यातील यंत्रणेवरच येणार आहे. मुंबई आणि पुण्यासारखी शहरं लॉकडाऊन करण्याआधी सरकारने जनतेला 2 ते 3 दिवस सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी देणे गरजेचं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात बॅचलर्स राहतात. पुण्यातील बॅचलर्समध्ये विद्यार्थी आणि आयटीसारख्या क्षेत्रातील मंडळींचा समावेश आहे. 


सुरक्षित ठिकाण आणि मुंबईच्या लोकसंख्येची घनता


मुंबईतही मोठ्या प्रमाणात असे तरूण आणि कुटूंब आहेत, जे एकटे राहतात किंवा ज्यांची पहिली पिढी ही मुंबईत आली आहे. या लोकांसाठी कोरोनासारख्या भयभयीत वातावरणात त्यांचं हक्काचं आणि सुरक्षित असणार ठिकाणं, जे काही असेल त्या ठिकाणी त्यांना जाऊ देणे गरजेचं होतं. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गावाकडे पाठवणं गरजेचं होतं.


कारण यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांची लोकसंख्येची घनता देखील अशा कठीण परिस्थितीत कमी झाली असती. तसेच घरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील कमी राहिली असती.


कोरन्टाईन शिक्केवाले सुटले आणि मुंबई-पुण्यात राबणारे अडकले


दुसरीकडे जे परदेशातून आले होते, ते सार्वजनिक वाहतुकीने मुंबईसारख्या शहरातून जिल्ह्यांकडून गावाकडे गेले. ज्यांना होम कोरंन्टाईनचा शिक्का मारून सोडून देण्यात आलं, त्यांना सक्तीने मुंबईत 14 दिवस कोरन्टाईन करणे गरजेचे होते. होम कोरंटाईनसाठी शासनाला अनेक सरकारी होस्टेल खाली करून घेता आले असते.


विशेष म्हणजे रेल्वेसेवा बंद झाली, बससेवा बंद झाली, खासगी वाहनांची वाहतूक बंद झाली पण, डोमेस्टिक विमानसेवा अजूनही बंद झालेली नाही. ती ेसेवा 24 मार्चपासून बंद होण्याची शक्यता आहे.


मुंबई-पुण्यातील बहुतांश मेस बंद, जेवणाचं काय?


कारण मुंबईत हॉटेलात काम कऱणारे, ड्रायव्हर असणारी मंडळी घरात बसून राहू शकत नाही, त्यांना गावी खायला तरी मिळेल या आशेने ते गावाच्या दिशेने निघाले आहेत.


अनेक विद्यार्थ्यांच्या मेस बंद झाल्या आहेत, रेस्टॉरंट बंद आहेत. महामारी आधी, भूकमरीचा सामना व्हायला नको, म्हणून लोक मुंबई आणि पुणे सोडत आहेत.


संचारबंदीचा निर्णय देखील मध्यरात्रीपासून घेणे आवश्यक होता, काही तास तरी त्यांना देणे आवश्यक होते, कारण लोक जे रस्त्यावर प्रवास करीत आहेत, त्यांचं काय होईल, जे रस्त्यावर आहेत, त्यांना जिल्हाबंदी लावली तर त्यांनी प्रवास कोणत्या दिशेने आणि कसा करायचा हा देखील प्रश्न आहे.


रस्त्यावरील प्रवासी रोखल्याने पोलीस प्रशासनावर ताण


हा प्रवास रोखण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा ताण येत आहे. आपण आपलीच यंत्रणा थकवण्याच्या कामाला लावतोय. जे सुरक्षित ठिकाणी जावू पाहत आहेत, शहरातील गर्दी कमी होत असेल, तर अशांची आरोग्य चाचणी घेऊन त्यांना घरी जाण्यासाठी 2 ते 3 दिवस देणे गरजेचं होतं. अनावश्यक शहरातल्या शहरात फिरणाऱ्यांचं समर्थन करता येणार नाही.


जयपूर शहर लॉकडाऊन केल्यानंतर जयपूर पोलिसांनी अनेकांना खाण्याची पाकिटं वाटली. पाणी दिलंय, ही परिस्थिती ओढवू नये म्हणून लोक शहर सोडतायत.