नवऱ्यामुळे बायकोचं आणि कुठे बायकोमुळे नवऱ्याचे कापले तिकीट!
निवडणूक म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांची एकमेकांवर कुरघोडी ही आलीच. पण, जेव्हा उमेदवारीचं तिकीट मिळविण्यासाठी पती आणि पत्नी एकमेकांविरोधात जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा कुणाचं तिकीट कापलं जातं, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं रंजक ठरतं.
धनंजय शेळके, झी मीडिया : उत्तर प्रदेशातील सरोजनगर विधानसभा मतदारसंघ सध्या यूपीमध्येच नाही तर देशभर चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या योगी सरकारमधील मंत्री स्वाती सिंग करत आहेत. त्यांनाच या मतदारसंघातून पुन्हा तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, स्वाती सिंग यांचे पती आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंग हे ही याच मतदारसंघातून इच्छुक होते. ओबीसी मोर्चाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे नवरा की बायको याचा वाद निर्माण झाला. पण, नवरा – बायकोच्या या वादात तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट मिळालं.
खरं तर सरोजनीनगर मतदारसंघ भाजपसाठी फारसा अनकुल राहिलेला नाही. मात्र, गेल्यावेळी स्वाती सिंग यांना तिकीट मिळालं. त्या चांगल्या मताधिक्यानं विजयी झाल्या आणि योगी सरकारमध्ये मंत्रीही झाल्या. इथंपर्यंत सर्व काही आलबेल होतं. मात्र, मंत्री झाल्यानंतर स्वाती सिंग आणि दयाशंकर सिंग यांच्यात खटके उडू लागले. तिकीटासाठी नवरा - बायकोनं जोरदार लॉबिंग सुरू केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते मतदारसंघात तयारी करत होते.
स्वाती सिंग यांना तिकीट मिळालं तर दयाशंकर सिंग नाराज होतील. तर दयाशंकर सिंग यांना तिकीट मिळालं तर स्वाती सिंग नाराज होतील असा पेच भाजपसमोर उभा राहिला होता. त्यामुळे भाजपने या सिंग नवरा बायकोला तिकीट नाकारलं आणि तिसऱ्यालाच संधी दिली. या नवरा बायकोच्या भांडणामुळे ज्यांना तिकीट मिळालं ते आहेत ईडीचे माजी संयुक्त संचालक राजेश्वरसिंग. त्यांनी व्हिआरएस घेऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परंतु, ईडीचा राजीनामा देऊन ते राजकीय आखाड्यात उतरल्यामुळे राजेश्वरसिंग यांच्यावर टीका होत आहे.
बायकोमुळे नवऱ्याचे तिकीट कापले
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार राहिलेल्या आदिती सिंग यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आदिती सिंग यांचं कुटुंब पिढ्यानं पिढ्या काँग्रेस आणि गांधी घराण्याचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं होतं. मात्र, उत्तर प्रदेशात काँग्रेसला फारसं भवितव्य दिसत नसल्यामुळे आदितीसिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्या रायबरेलीच्या भाजपच्या उमेदवार आहेत.
आदिती सिंग यांचा विवाह पंजाबमधील अंगदसिंग यांच्याशी झाला होता. अंगदसिंग यांचीही पंजाबमध्ये मोठी राजकीय पार्श्वभूमी राहिलेली आहे. २०१७ च्या निवडणुकीत आदिती सिंग रायबरेलीतून काँग्रेसच्या तिकीटावर तर अंगदसिंग पंजाबमधील नवाशहर मतदारसंघातून निवडून आले होते. पंजाबमध्ये भाजपची फारशी ताकद नसल्यामुळे यावेळीही अंगदसिंग नवापूरमधून काँग्रेसकडूनच इच्छुक होते. मात्र, काँग्रेसनं त्यांचं तिकीट कापलं आहे. आदितीसिंग यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळेच त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे.
आईमुळे मुलाचे तिकीट कापले !
भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी हे लखनऊमधील केंट विधानसभा मतदारसंघातून तिकीटासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. एका कुटुंबात, एकच तिकीट या नियमामुळे मयंक यांना तिकीट मिळाले नाही. खासदार रिटा बहुगुणा जोशी यांनी आपण २०२४ ची निवडणूक लढवणार नाही आणि पक्षाला जर वाटत असेल तर आपण आताच खासदारकीचा राजीनामा देते. मात्र, माझ्यामुळे पंकज जोशी यांना तिकीट नाकारु नये अशी विनंती भाजप हायकमांडकडे केली होती. परंतु, त्यांच्या मागणीला पक्षानं प्रतिसाद दिला नाही.
अर्थात राजनाथसिंग हे केंद्रात मंत्री असूनही त्यांचा मुलगा पंकजसिंग यांना मात्र पक्षाने पुन्हा एकदा विधानसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे रिटा बहुगुणा जोशी नाराज झाल्याची चर्चा आहे. आता त्या काय पाऊल उचलतात ते पहावं लागेल.