मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून १-१ अशी बरोबरी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला हार पत्कारावी लागली होती. 'द बेस्ट फिनिशर' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या सामन्यात धोनीने त्याच्या अंदाजात भारतीय संघाला विजय मिळवून दिल्याने 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याने धोनीचे कौतुक केले. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात धोनी महत्वाची भूमिका साकरणार, अशी आशाही व्यक्त केली 


सचिन तेंडुलकरने सांगितले की, मंगळवारी झालेल्या सामन्यात धोनीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरले. पहिल्या सामन्यात मला वाटले की, मैदानात त्याला थोडी जादा मेहनत करावी लागते आहे. धोनीला योग्य त्या ठिकाणी चेंडू पाठवण्यास अडचणी निर्माण झाल्या. परंतु, दुसऱ्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी करुन भारताला विजय प्राप्त करुन दिला. महेंद्र सिंह धोनी इनिंगला पुढे घेवून जाण्यास तसेच सामन्याचा योग्यपणे शेवट करण्यात तरबेज आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खेळीबाबत प्रश्न निर्माण झाले होते. सचिन म्हणाला की, धोनीच्या डोक्यात सामन्याचे गणित तयार असते. महेंद्रसिंह धोनी असा खेळाडू आहे जो एकट्याच्या जीवावर सामना जिंकून देऊ शकतो.