भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या (Arshadeep Singh) धर्मावर भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याने याप्रकरणी माफीही मागितली आहे. पण तरीही हरभजन सिंग (Harbhajan Singh) मात्र त्याला माफ करण्याच्या तयारीत नाही. त्याच्या विधानामुळे भावना दुखावल्या असून, हे फार असंवेदनशील विधान असल्याचं हरभजन म्हणाला आहे. भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना कामरान अकमलने अखेरची ओव्हर टाकणाऱ्या अर्शदीपच्या धर्माचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काहीही होऊ शकतं. अखेरची ओव्हर अर्शदीप सिंग टाकणार आहे. तो फार लयीत दिसत नाही आहे. त्यात आता 12 वाजले आहेत," असं उपहासात्मकपणे कामरान अकमलन म्हटलं. यानंतर सर्वजण हसू लागले आहेत. कामरान अकमलच्या विधानावर हरभजन सिंग यांच्यासह अनेक क्रिकेटर्सनी नाराजी जाहीर केली होती. यानंतर कामरान अकमलनेही तात्काळ माफी मागत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला होता. 



कामरान अकमलने म्हटलं होतं की, "माझ्या अलीकडील विधानाबद्दल मला मनापासून खेद वाटतो. हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. मला खरंच माफ करा".



पण कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजन सिंगने पुन्हा एकदा त्याला सुनावलं असून या प्रकऱणाचं गांभीर्य सांगितलं आहे. तसंच भविष्यात अशी विधानं करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. "एखाद्या नालायक व्यक्तीकडून केलं जाणार हे अत्यंत मूर्ख आणि बालिश विधान आहे. कामरान अकमलला कोणाच्याही धर्मावर भाष्य करत त्यांची खिल्ली उडवण्याचं कारण नाही हे समजून घ्यायला हवं. मला कामरान अकमलला तुला शिखांचा इतिहास माहिती आहे का? असं विचारायचं आहे. शीख कोण आहेत, त्यांनी तुमच्या आया, बहिणी, समुदायाला वाचवण्यासाठी काय केलं हे तुला माहिती आहे का?", अशी विचारणा हरभजन सिंगने केली आहे..


"हे तुमच्या पूर्वजांना विचारा, रात्री 12 वाजता शिखांनी मुघलांवर हल्ला करून तुमच्या माता-भगिनींना वाचवले होते, त्यामुळे मूर्खपणाचे बोलणे बंद करा. त्याला इतक्या लवकर समजले आणि माफी मागितली हे चांगले आहे, परंतु त्याने पुन्हा कधीही कोणाला दुखवण्याचा प्रयत्न करू नये. शीख किंवा कोणत्याही धर्माचा आम्ही आदर करतो, मग तो हिंदू, इस्लाम, शीख किंवा ख्रिश्चन असो...", असंही हरभजन सिंगने सुनावलं आहे.