`या` भारतीय महिला क्रिकेटरने तोडला धोनी, रोहितचा रेकॉर्ड
भारताकडून १००वा टी-२० सामना खेळणारी पहिली महिला खेळाडू
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांचा सामना करत प्रगतीपथावर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले आहेत. आता पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू हरमनप्रीत कौरने, दक्षिण अफ्रिकेसोबत सुरु असलेल्या सहाव्या टी-२० सामन्यावेळी मैदानात उतरताच एक रेकॉर्ड केला आहे. हरमनप्रीत भारताकडून १००वा टी-२० सामना खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
हरमनप्रीतने या अनोख्या रेकॉर्डसह, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.
हरमनप्रीतने धोनी आणि रोहितच्या तुलनेत २ टी-२० सामने अधिक खेळले आहेत. या यादीमध्ये न्यूझीलंड संघाची सूजी बेट्स आणि ऑस्ट्रेलिया संघाची एलिस पेरी हरमनप्रीतहून पुढे आहे. या दोघींच्या खात्यात १११ सामन्यांचा रेकॉर्ड आहे.
हरमनप्रीतच्या बरोबरीत पाकिस्तानची बिस्माह माहरुफ आणि वेस्टइंडिजची स्टेफानी टेलर असून यांनी १०० सामने खेळले आहेत.
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज हरमनप्रीतहून मागे आहे. मिताली राजने आतापर्यंत ८९ सामने खेळले आहेत. या यादीमध्ये भारतीय महिला संघाची झूलन गोस्वामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत.