Virat Kohli : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली हा जगभरात सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. परंतु विराट कोहली खेळाव्यतिरिक्त व्यवसायामध्ये देखील तो खूप पुढे आहे. विराट कोहलीची स्वत: ची कंपनी आहे. तो त्याच्या कंपनीच्या जाहिरातींमध्ये सतत दिसत असतो. त्यामुळे विराट कोहली खेळासोबतच एक उत्तम अभिनेता देखील आहे. जाहिरातींमध्ये त्याचे अभिनय कौशल्य दिसून येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्काने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे विराट कोहलीला बॉलिवूडमध्ये अभिनय करणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी आता विराट कोहलीला एक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही क्रिकेटपटूने चित्रपटांमध्ये काम करु नये. त्यांनी खास करून विराट कोहलीला भविष्यात चित्रपटात न येण्याचा सल्ला दिला आहे. 


काय म्हणाले मुकेश छाबरा? 


दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीबद्दल YouTuber रणवीर अल्लाबादियाच्या पॉडकास्टवर बोलत असताना एक सल्ला दिला आहे. यावेळी मुकेश छाबरा यांनी विराट कोहलीचे कौतुक देखील केले आहे. मात्र, त्यांनी विराट कोहलीला चित्रपटांमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश छाबरा म्हणाले की, विराट कोहली हा आधीपासून एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आपले यश खूप चांगले हाताळले आहे. खेळासोबतच तो लुकने आणि फिटनेसने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. 


विराट कोहलीने अनेक जाहिराती केल्या आहेत. त्याच्यामध्ये अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच नृत्य, कॉमिक आणि मिमिक्रीचे मुकेश छाबरा यांनी देखील कौतुक केले आहे. मुकेश छाबरा पुढे म्हणाले की, विराट कोहली हा खूप हुशार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्याने चित्रपटांपासून दूर राहिले तर बरे होईल. असा सल्ला त्यांनी विराट कोहलीला दिला आहे. काही वर्षांपूर्वी ते विराट कोहलीला भेटले होते. तो खूप मजेदार आहे असं त्यांनी सांगितले होते. याआधी हरभजन सिंग, अजय जडेजा आणि श्रीशांत सारखे भारतीय खेळाडू हे हिंदी चित्रपटांमध्ये कॅमिओच्या भूमिकेत दिसले आहेत.