१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोठा दिलासा मिळालाय. कारण कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन स्थगित करण्यात आलेय. आजपासून नियमित तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यात येणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालय महासंघाची बैठक शिक्षणमंत्र्यांसोबत झाली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आलेय.
९ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची सकारात्मक बैठक झाली. बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी उद्यापासून ऑन लाइन जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील मागण्यांच्या बाबतीत निर्णय झाला असून शासनाने तसे पत्रकही संघटनेस दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिली.
दरम्यान, २०१२ पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्ती मान्यता देण्यात येईल. तसेच कायम विना अनुदानितची मूल्यांकणास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑन लाइन जाहीर करण्यात येणार आहे. १७१ वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदी साठी व अर्थ खात्याशी संबंधीत इतर मागण्यांसाठी दि. १७ एप्रिल २०१८ रोजी मा.अर्थ मंत्र्यांबरोबरच्या संयुक्त बैठकीत निर्णय करणे, आदींवर चर्चा झालेय.
चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आलेय. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आणि विद्यार्थी हितासाठी महासंघाने आंदोलन स्थगित केले आहे. आजपासून नियामक (मॉडरेटर्स)तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करतील. त्यामुळे १२ वीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिली.