मुंबई : नवे वर्ष आले म्हटल्यावर सेलीब्रेशन आणि रिझोल्यूशन (संकल्प) देखील ओघाने आलेच!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल…रिझोल्यूशन हे पूर्ण होतातच असे नाही… पण तरीही ते केले जातातच! पण यावेळी जरा आपण वेगळे संकल्प करूया…ज्या गोष्टींचा आपण कधीही विचार केला नाही त्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करूया….कदाचित समाजातील सध्याची परिस्थीती बघता या सर्वांची गरज निर्माण झाल्याचे वाटते….


* सोशल मिडियाला कमी परिवाराला जास्त वेळ देणार 


अलिकडे सर्वच वयोगटातील लोक हे सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकत चालल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे व्यक्तींमधील समोरासमोर होणारा संवाद कमी झाला असून मोबाईल, कम्प्युटरमध्ये लोक अडकून पडले आहेत. संवाद आता केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅंटींग, फेसबुक चॅटींग, मेल्सपुरता मर्यादीत झाला आहे. अशात घरातील लोकांपासून अनेकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यामुळे नव्या वर्षाचा जर संकल्प करायचाच असेल तर या गोष्टी तुम्ही विचार करू शकता. सोशल मिडीयाला जरा दूर ठेवून आपल्या लोकांना, परिवाराला वेळ दिला तर कदाचित तुम्हाला जास्त आनंद मिळेल. सोशल मिडियाचं व्यसन कमी होण्यात त्यांचीच मदत तुम्हाला मिळेल. याशिवाय मित्रांसोबत चॅंटींगवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात बोलण्याची मजा काय असते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये.


* जग काय म्हणेल याचा विचार सोडणार


ते काय म्हणतील? त्यांना काय वाटेल? याचा विचार करून आजही समाजात जास्तीत जास्त लोक जगतात. हे जगणं तुमचं नसून दुस-यांचं झालं आहे. कुणाला काय वाटतं याचा करून जगणं हे खरंच योग्य आहे का? तर नाही. जर दुस-यांचा विचार करून तुम्ही जगत असाल तर त्या जगण्यात काय मजा. तुम्हाला जे वाटतं. तुमच्या मनाला जे पटतं ते करण्यात दुस-यांचा का विचार करायचा? तुम्हाला स्वत:ला मन आहे, बुद्धी आहे. तुमचे स्वत:चे विचार आहेत. मग समोरच्याला काय वाटतं हे का? त्यामुळे जर संकल्प करायचाच झाला तर हाही एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे.


* सगळे करतात म्हणून मी ते करणार नाही 


अलिकडे हाही प्रकार खूप वाढला आहे. एखाद्याने जर त्यांचं मुल इंग्रजी शाळेत घातलं तर आपणही घालायचं. पण आधी त्याची गरज लक्षात घ्यायची नाही. मग नंतर त्याच्या अनेक अडचणी आल्या की डोक्यावर हात देऊन बसायचं, असं काहीसं होताना दिसत आहे. दुसरा काय करतोय त्यापेक्षा तुम्हाला काय करावं वाटतं, तुम्हाला काय योग्य वाटतं ते का करत नाहीत? तुम्हीही शिक्षीत आहात. तुम्हालाही विचार करण्याची शक्ती आहे मग दुस-यांच्या पावलावर पाऊल का द्यायचं? शेवटी सांगताना तुम्ही हेच सांगाल ना की त्याने केलं म्हणून मी केलं. मग त्याने शेण खाल्ल तर तुम्हीही खाणार का? त्यामुळे असं काही होऊ न देता स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. (कुणाच्या चांगल्या गोष्टी फॉलो करत असाल तर त्या अपवाद आहेत)


* अंथरून पाहून पाय पसरणार


आपली ऎपत नसतानाही अनेकदा अनेकजण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण हे प्रयत्न तेव्हाच पाण्यात जातात. अलिकडे ऑनलाईन शॉपिंगचं एक फॅडच आलं आहे. जवळ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असल्याने उठसूठ शॉपिंग करण्याची सवय अनेकांना लागली आहे. ईएमआयवर मिळतं म्हणूण काय मग सगळं घेतच सुटायचं का? आणि मग कर्जाचं बोजा झाला की, पुन्हा दुस-यांसमोर हात पसरायचे. त्यापेक्षा आवश्यक त्या, गरज आहे त्याच गोष्टी ऑनलाईन खरेदी करा. पैसे तुमचेच आहेत पण फॅड म्हणून ती गोष्ट करणे जरा चुकीचेच वाटते किंवा स्टेटस म्हणूनही ही गोष्ट चुकीची वाटते.


* फास्ट फूड कमी खाणार


आजच्या धावपळीच्या जीवनात लहान वयातच अनेक आजारांचा अनेकांना सामना करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार कमी वयात आज होताना दिसताहेत. त्यात घरच्या जेवणापेक्षा चटपटीत फास्टफूडला प्राधान्य दिलं जातं. पण यामुळे तर आजार जास्त जवळ येतात. तुमचा जाडेपणा याने जास्त वाढतो. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत: घेतली तर तुमचे दवाखान्याचे पैसेही वाचतील. इतकेच काय तर बाहेर खाण्याचे तुमचे पैसेही वाचतील. बाहेरची पोळी, भाजी असेल तर काही हरकत नाही पण बर्गर, पिझ्झा, चायनिज अशा फास्टफूडमध्ये आरोग्य धोक्यात येत आहे.


* ज्याची आवड आहे ते शिकणार


या धावपळीच्या जीवनात माणूस करिअरच्या आणि पैसे कमवण्याच्या मागे जास्त लागल्याचं बघायला मिळतं. अशात इच्छा, स्वप्न, आवड या सगळ्या गोष्टी मागे पडतात. कुणाला काही वाचायचं असतं तर ते राहून जातं, कुणाला एखादा चांगला सिनेमा बघायचा असतो तर तो राहून जातो, कुणाला कुठे फिरायला जायचं असतं तेही राहून जातं. यासोबतच कुणाला म्युझिक शिकायचं असतं, कुणाला भाषा शिकायची असते, कुणाला डान्स-गाणं शिकायचं असतं ते राहून जातं. पण जर तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या गोष्टीच शिकू शकत नसाल तर तर तुमच्या पैसे कमावण्याला काय अर्थ राहणार ? त्यापेक्षा स्वत:ला वेळ देऊन जे आवडतं ते शिकण्याचा संकल्प करा. कदाचित त्यातून तुम्हाला जास्त आनंद मिळेल.


* आधी अभ्यास मग भाष्य


सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांसाठी आपलं मत व्यक्त करण्याचं एक चांगलं हक्कांचं माध्यम उपलब्ध झालं आहे. अनेकजण यावरून आपले विचार मांडू लागेल आहेत. त्याला लाईक्स मिळतात, त्यावर कमेंट्स येतात. पण त्यावरून वादही होण्याचे अनेक प्रकार घडतात. प्रत्येक व्यक्ती हा त्या विषयातील पंडीत असल्यासारखा वागतो आहे. मुळात एखाद्या विषयावर जर तुम्हाला बोलायचं असेलच तर त्या विषयाची पूर्ण माहिती घ्या आणि नंतर त्यावर भाष्य करा….नाहीतर अर्धवट माहितीवर भाष्य केल्यास वाचणा-यांनाही ते पटणार नाही. आणि पटल तरीही ते अर्धवट माहिती असणार ज्याने अनेकांचे नुकसानच होणार आहे. लोकं बोलतात, विरोध करतात, सपोर्ट करतात म्हणून आपणही तेच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमचं ठरवा. आधी माहिती मिळवा आणि मग बोला त्याने तुमचाच फायदा आहे. निदान तुमच्यावर लेबल तरी लागणार नाही ना!


करून पाहा पुढील गोष्टी…


१. ध्येय ठरवताना आपल्याकडे असलेल्या वेळेचा अंदाज घ्या.
२. मित्रांना आपल्या संकल्पाविषयी सांगा.
३. संकल्पपूर्तीच्या लाभांविषयी विचार करा.
४. कोणत्याही स्थितीत संकल्पाशी तडजोड करू नका.
५. धुम्रपान आणि मद्यपान सोडणे तसे कठीण असते, त्यामुळे स्वमदत पुस्तिकेचा वापर करा.