मुंबई : १३ जुलै रोजी बिट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गोवा येथे झालेल्या मार्स प्री स्कूल बी या विज्ञान स्पर्धेत देशाभरातील  १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय फेरीमध्ये पास झाल्यानंतर १२५ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील बिट्स इंस्टीट्यूट, गोवा येथे अंतिम परीक्षा घेण्यात आली. मुंबईच्या पवार पब्लिक स्कूलचा दैविक विशाल कडणे हा या स्पर्धेत देशात पहिला आहे. दैविकला प्रथम पारितोषिक आणि 10 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. दैविक हा नर्सरी वर्गात शिकत असून तो फक्त साडे चार वर्षाचा आहे.


गणित विषयात त्याने द्वितीय क्रमांक मिळवला तर इतर दोन विषयांमध्ये त्यांने पहिला क्रमांक पटकवला आहे. या परीक्षेत इतकं मोठं यश मिळवणारा तो आतापर्यंतचा सर्वात लहान वयाचा विद्यार्थी ठरला आहे. इतक्या कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय. दैविकच्या या यशाचं संपूर्ण श्रेय दैविकच्या आईने पवार स्कूलच्या सर्व शिक्षकांना दिले आहे. दैविकची आई गृहिणी असून वडील इंजिनिअर आहेत. दैविकच्या ह्या यशामागे त्याचे आजोबा विजय कडणे आणि आई जयश्री कडणे यांची प्रेरणा असल्याचे दैविकच्या आईने म्हटलं आहे. दैविक आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेची तयारी करत आहे. ऑगस्टमध्ये तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देणार आहे.