इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीएच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबईसह राज्यभरातील इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान जातपडताळणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सीईटीने सेल यांनी जाहीर केलेल्या प्रवेशाच्या नियमावलीनुसार, यंदापासून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतानाच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. मर्यादित दिवसांत प्रमाणपत्र सादर करायचे कसे, हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला होता. याबाबत विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सामाजिक न्याय विभाग व आदिवासी कल्याण विभागाशी चर्चा करून या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन तीन महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.