मुंबई : संघर्षाला हवी साथ या झी 24 तासनं सुरू केलेल्या विशेष उपक्रमाची यशस्वी सांगता आज विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानं मुंबईत होणार आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर आणि अडचणींवर मात करत, दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-या 20 गरजू गुणवंतांच्या संघर्षकहाण्या आम्ही गेले महिनाभर आपणाला दाखवल्या. त्यांच्या संघर्षाला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्राच्या दातृत्वाला आम्ही आवाहन केलं. त्यानुसार केवळ महाराष्ट्र किंवा देशातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी 24 तासच्या प्रेक्षकांनी या गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांना लाखमोलाची मदत धनादेशरूपानं दिली. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचं यंदा चौथं वर्ष आहे. याआधीच्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी मदत जमा झाली आहे. ही मदत त्या गुणवंतांना देण्याचा सोहळा आज सकाळी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडणार आहे.


शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, सिने अभिनेते अशोक सराफ, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे दिनेश घोडके आदी मान्यवरांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या दुर्गम, ग्रामीण भागातल्या या विद्यार्थी रत्नांना मुंबई दर्शन सफरही घडवण्यात येणार आहे.