कमी पैशात जास्त शॉपींग कशी कराल?
कमी पैशात जास्त शॉपींग करण्याच्या स्मार्ट टीप्स...
मुंबई : पैशांची अॅलर्जी कुणालाच नसते. त्यामुळे पैसे साठवायचे असतात ते बचत करून, हे आपण जाणतोच. पण, हे करताना नेमके काय करायला पाहिजे यावर आपण कधीच विचार करत नाही. म्हणूनच जाणून घ्या कमी पैशात जास्त शॉपींग कशी करावी आणि पैसे वाचवावे.
योग्य नियोजन
तुम्हाला जर कमी पैशात जास्त शॉपींग करायची असेल तर, पहिला मुद्दा हा की योग्य नियोजन करा. तुम्हाला ज्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्याची एक यादी बनवा. त्यातही आपल्याला आवश्यत असलेल्या गोष्टींचा अग्रक्रम ठरवा. त्याची एकूण संख्याही ठरवा. नाहितर दोन ड्रेस खरेदी करायला जायचे आणि चार ड्रेस खरेदी करून यायचे असे करू नका. तुमच्या खरेदीची एकूण रक्कम किती होते पहा. त्यातून 25 टक्के वजा करा आणि उर्वरीत पैशांतूनच खरेदी करा. एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर जात असेल तर, ती पुढच्या वेळी खरेदी करा. उदा. तुमचे बजेट 100 रूपये झाले असेल तर, त्यातून 25 रूपये वजा करा. उर्वरीत 75 रूपयांतूनच खरेदी करा.
ऑफर्सवर बारीक लक्ष ठेवा
अनेकदा मार्केटमध्ये विविध ऑफर्स पहायला मिळतात. अशा वेळी आपणही या ऑफर्सना भुलून भरमसाठ खरेदीच्या नादी लागतो. पण, लक्षात ठेवा ऑफर्मुळेही अनेकदा खर्चात वाढ होते. अशा वेळी आपले नियोजन कामी येते. खरेदीची यादी पहा. विविध दुकानांत काय ऑफर्स आहे याची खात्री करा. मगच खरेदी करा.
खरेदीचे ठिकाण नक्की करा...
खरेदीसाठी योग्य ठिकाण ठरवा. त्यासाठी योग्य आणि माफक दर आणि गुणवत्ता याचा मेळ घाला. आपल्या खरेदीचे सूत्र जिथे पूर्ण होत असेल अशाच ठिकाणी खरेदी करा.
क्रेडीट, डेबिट कार्डचा वापर शक्यतो टाळा
खरेदी करताना क्रेडीट, डेबिट कार्ड वापरू खरेदी करणे शक्यतो टाळा. कारण, क्रेडीट कार्ड वापरताना पैसे फटाफट जातात. त्यातून खर्चाचे आकडे कळतात, पण खरेदीचा मोह टाळता येत नाही. तुम्ही जर रोख व्यवहार करत असाल तर, तुम्हाला तुमच्या खिशाचा अंदाज बरोबर लागतो.
किमतीचा अंदाज घ्या..
तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तूची किंमत बरोबर आहे का हे तपासा. अनेकदा गडबडीत गुणवत्ता नसलेली वस्तूही जास्त किमतीत खरेदी केली जाते. त्यामुळे केवळ ब्रॅंडच्या मागे फरपटत जाण्यापेक्षा गुणवत्ता आणि किमतीला महत्त्व द्या.
बिलाकडे लक्ष ठेवा
खरेदी झाल्यावर दुकानदार बिल बनवत असताना ते तपासून घ्या. अनेकदा छुपे चार्जेस, बिलाची डबल एण्ट्री मारणे, खेरदी न केलेल्या वस्तूही बिलाच्या माध्यमातून माथी मारणे, असे प्रकार घडतात.
गडबडीत खरेदी टाळा...
कोणतीही शॉपींग ही गडबडीत करण्याची गोष्ट मुळीच नाही. त्यासाठी वेळ काढा. शांतपणे खरेदी करण्यासाठी जा. उगाच गरज पडली आणि खरेदीला निघाले असे करू नका. असे केल्याने खर्च तर होतोच. पण, गुणवत्तापूर्ण वस्तूही हाती लागत नाही. शक्यतो साप्ताहीक, सामुहीक सुट्टीदिवशी खरेदी टाळा.
अशाप्रकारे आपण पैसे खर्च करूनही पैशांची बचत करू शकता.