तब्बल १३ दिवस चाललं `या` गाण्याचं चित्रीकरण
या गाण्याचं चित्रीकरण करतेवेळी......
मुंबई : मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे पानिपतची लढाई किंवा पानिपतचं युद्ध. ज्या घटनेमुळे पुढच्या पिढ्यांवर थेट परिणाम झाले, ज्या घटनेने परिस्थितीलाच एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं अशा या ऐतिहासिक घडामोडीवर दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी चित्रपट साकारला आहे. 'पानिपत' असंच या चित्रपटाचं नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर, नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं त्यातील गाणं यांसोबतच चर्चेला निमित्त ठरत आहे ती म्हणजे या चित्रपटाची भव्यता. ट्रेलर आणि पहिलं गाणं, मर्द मराठा पाहता या भव्यतेचा हलकासा अंदाजही आला आहे. मुळात 'मुंबई मिरर'चं वृत्तही गाण्याच्या चित्रीकरणाविषयीची माहिती या भव्यतेवर शिक्कामोर्तब करत आहे.
पेशवाईचा काळ, गणपतीची भव्य प्रतिमा आणि १३०० कलाकार (डान्सर) अशा एकंदर योगदानात 'मर्द मराठा' हे गीत साकारण्यात आलं. या कलाकरांमध्ये लेझीम नृत्य करणाऱ्या मंडळींचाही सहभाग आहे.
राजू खान यांनी या गीताचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे, ज्याच्या चित्रीकरणासाठी एक- दोन नव्हे तर, तब्बल १३ दिवस मेहनत घ्यावी लागली. कर्जत येथे शनिवारवाड्याच्या भव्य सेटवर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. कलादिग्दर्शत नितीन देसाई यांनी या सेटची निर्मिती केली होती.
अजय- अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या या गीतातील शब्दही मराठा साम्राज्य आणि संस्कृतीला मोठ्या ताकदीने सर्वांपुढे सादर करत आहेत. चित्रपटातील या गीतमध्ये रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी, मिलिंद गुणाजी आणि इतरही मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. जी खऱ्या अर्थाने गाण्याची जमेची बाजूही आहे. एकंदरच भव्यतेच्या पायावर उभा असणारा हा 'पानिपत' ६ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो का, हे पाहणं महत्त्वाचं.