15 वर्षीय शेतकऱ्याच्या 13 गायी दगावल्याचं समजल्यानंतर अभिनेता थेट त्याच्या घरी पोहोचला अन्...
15 Year Old Dairy Farmer Meet Actor: या 15 वर्षीय शेतकरी मुलाचे वडील 2 वर्षांपूर्वीच वारले असून तो कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी शेती आणि पशुपालनाचा व्यवसाय करतो.
15 Year Old Dairy Farmer Meet by Actor: कलाकारांनी गरजू लोकांना मदत करणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र सध्या केरळमध्ये काही सेलिब्रिटींनी पुढे येऊन एका शेतकऱ्याला केलेली मदत फारच चर्चेत आहे. ज्या शेतकऱ्याला या सेलिब्रिटींनी मदत केली आहे तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. मॅथ्यू बेनी असं या शेतकरी मुलाचं नाव असून 2 वर्षांपूर्वी वयाच्या 13 व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यापासून तोच शेतीची कामं करतो. आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी आपला धाकटा भाऊ आणि बहिणीच्या मदतीने तो शेती करतो. मात्र नुकतेच मॅथ्यूला 6 लाखांचा आर्थिक फटका बसला तो त्याच्याकडील गायी दगावल्याने.
नक्की घडलं काय?
मॅथ्यूकडील 20 गायींपैकी 13 गायी अन्नामधून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. सुक्या चाऱ्यामधून विषबाधा झाल्याने या गायींचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार या सुक्या चाऱ्यामधील हायड्रोकॅनिक अॅसिडमुळे गायी दगावल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाळलेली कंदमुळं या गायींना खायला घालण्यात आली होती. मात्र हा असा चारा सामान्यपणे गायींना दिला जात नाही असंही सरकारी अधिकारी म्हणाले. मॅथ्यूबरोबर घडणारी घटना व्हायरल झाल्यानंतर अभिनेता जयराम यांनी त्याला 5 लाखांची मदत केली आहे. त्यांनी मॅथ्यूला भेट देऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. आपल्या आगामी 'अब्राहम ओझलर' नावाच्या चित्रपटाच्या टीमच्यावतीने हा धनादेश जयराम यांनी सुपूर्द केला. जयराम यांनी मॅथ्यूला 'सर्वकाही लवकरच ठीक होईल,' असं म्हणत त्याला धीर दिला.
कार्यक्रम रद्द करुन केली मदत
'अब्राहम ओझलर' चित्रपटाच्या टीमने त्यांच्या ट्रेलर लॉन्चसाठीचा इव्हेंटमधील पैसा मॅथ्यूला दिला. त्यांनी या इव्हेंटसाठी खर्च केले जाणारे 5 लाख मॅथ्यूला देऊन ट्रेलर लॉन्चचा इव्हेंटच रद्द केला. हा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी होणार होता. "मी सुद्धा अशा परिस्थितीमधून गेल्याने मला या दु:खाचा अंदाज आहे. आता माझं ध्येय या अशा मुलांना पाठिंबा देण्याचं आहे," असं जयराम यांनी म्हटलं आहे. जयराम यांच्या 22 गायी 6 वर्षांपूर्वी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने दगावल्या होत्या. तामिळनाडूमधील कृष्णागिरी येथून आपण उत्तम प्रजातीच्या गायी विकत घेऊन देण्यास मदत करण्याची तयारीही जयराम यांनी मॅथ्यूला बोलून दाखवली.
यांनीही केली मदत
जयराम यांच्याबरोबरच 'अब्राहम ओझलर'मधील अभिनेते मेहमुट्टी आणि पृथ्वीराज यांनीही अनुक्रमे 1 लाख आणि 5 लाखांची मदत मॅथ्यूजला दिली आहे. कलाकारांबरोबरच राज्यातील मंत्री जे. चिंचू राणी आणि रोशे ऑगस्टीन यांनी मॅथ्यूच्या गावाला भेट दिली. त्यांनी राज्य सरकारकडून मॅथ्यूला शक्य ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.