मुंबई : छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं  अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे 'शिवरायांचा छावा' साकारणार कोण..? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. 


'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन/साउंड डिझाईन-निखिल लांजेकर आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी अशी इतर श्रेयनामावली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.


अलीकडेच आलेल्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली होती. त्यातच आणखी एका नव्या पोस्टरने आपल्या उत्सुकतेमध्ये भर घातली आहे. दणकट शरीरयष्टी.. धारदार नाक... डोळ्यांत फुललेला अंगार.. ती मनाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि मागे सिंहाच्या रुद्रावताराची छबी. अगदी सूचक अशा या पोस्टरमधून 'शिवरायांचा छावा' आपल्या समोर मोठया दिमाखात अवतरला आहे. पण.. अजूनही या कलाकाराची ओळख आपल्याला पटलेली नाही. शंभूराजेंच्या तेजाळत्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा हा नवा चेहरा नेमका आहे तरी कोण..? यासाठी आपल्याला अजूनही वाट पहावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या  चित्रपटातील प्रमुख पात्र निभावणाऱ्या या कलाकाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे.