Adesh Bandekar : अंगारक चतुर्थीचा `तो` दिवस मी विसरु शकत नाही, आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर, पाहा Video
Shree Siddhivinayak Temple Trust Chairman : माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.
Aadesh Bandekar Emotional post : महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरुन प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांना बाजूला करत शिंदे गटाच्या आमदाराला अध्यक्षपद देण्यात आलं आहे. आदेश बांदेकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. होम मिनिस्टर या प्रसिद्ध मालिकेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी असा त्यांचा उल्लेख केला जातो. माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.
काय म्हणाले आदेश बांदेकर?
२४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला. पण या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही… हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले, असे आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे.
पाहा पोस्ट
आदेश बांदेकर यांचा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर आता सदा सरवणकर यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर १९९२ ते २००७ अशी १५ वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले.