`सार्वजनिक ठिकाणी आपले घाणेरडे...`, पुरुष पार्टनर खच्चीकरण करतात म्हणणाऱ्या Ex-Wife संजीदा शेखला आमीरचं उत्तर
आमिर अली आणि संजीदा शेख यांचे 2012 मध्ये लग्न झाले. त्यांना 2018 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी झाली. 2020 मध्ये ते वेगळे झाले आणि अखेरीस 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
अभिनेता आमीर अली 2021 मध्ये संजीदा शेखपासून विभक्त झाला होता. दरम्यान नुकतंच त्याने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पूर्वाश्रमीच्या पत्नीने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आमीरने म्हटलं की, "मी आणि ती जे काही बोलतो, ते नेहमीच एकमेकांबद्दल नसतं. आम्ही जवळपास 5 वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहोत. यादरम्यान तिने असा काही अनुभव घेतला असावा". संजीदा शेखने एका मुलाखतीत कोणाचंही नाव न घेता प्रेरित न करणाऱ्या पार्टनर्सबद्दल म्हटलं होतं. नेटकऱ्यांनी संजीदाचा इशारा आपल्या पहिल्या पतीकडे होता असा दावा केला होता.
आमीर अलीने यावेळी आपल्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकपणे बोलायचं नाही आणि आपण विभक्त होणं ही आता जुनी बाब झाली असल्याचं सांगितलं. यावेळी त्याने आपण जे काही सहन केलं त्याबद्दल सांगताना म्हटलं की, "आमची जुनी गोष्ट आहे जी आता संपली आहे. मला माहित आहे की त्या विभक्त होण्याच्या काळात मी काय केले आणि माझे काय झाले. पण सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे कपडे धुणे हे योग्य नाही. मी कधीही कोणाला कमी लेखलेलं नसून, कधीच करणार नाही. खासकरुन ज्यांच्यासोबत माझे संबंध होते".
Hauterrfly ला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत, संजीदाने अशा लोकांशी संबंध तोडण्याचे महत्त्व सांगितले ज्यांचा तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. ती म्हणाली, "असे काही पुरुष आहेत आणि असे पार्टनर आहेत जे तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, जे तुम्हाला सांगतात की तुम्ही काहीही करू शकत नाही. किंवा ते म्हणतील की तुम्ही हे करू शकणार नाही. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले. प्रत्येक नात्यात असे टप्पे असतात जिथे तुम्ही आनंदी असता, आणि मग काही असे असतात जेव्हा तुम्ही नसता, आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी निर्णय घेता. तेच मी माझ्यासाठी केले होते, कारण मी स्वतःवर प्रेम करू लागले आणि मी स्वतःला प्राधान्य देऊ लागले. ते खूप, खूप महत्वाचे आहे."
आमिर अली आणि संजीदा शेख यांचे 2012 मध्ये लग्न झाले. त्यांना 2018 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी झाली. 2020 मध्ये ते वेगळे झाले आणि अखेरीस 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजीदाने संजय लीला भन्साळीच्या हीरामंडीमध्ये तिच्या दमदार अभिनयाने लक्ष वेधून घेतले. ती फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि करण सिंग ग्रोव्हरसोबत दिसली होती. 'जाने पहले से ये अजनबी', 'बदलते रिश्तों की दास्तान' आणि 'इश्क का रंग सफेद' यासारख्या अनेक मालिकांमध्येही ती दिसली आहे. आमिर अली वेबसिरीज 'लुटेरे'मध्ये शेवटचा दिसला होता.