#MeToo मोहिमेमुळे आमिरही अस्वस्थ, निर्माते संघटनेची बैठक
बैठकीला आमीर खानसह सिद्धार्थ रॉय कपूर आणि इतर प्रॉडक्शन कंपनीचे सीईओ हजर
मुंबई : सध्या समाज माध्यमांवर सुरू असलेल्या #MeToo अभियानामुळे बॉलिवूडमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलीय. अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप होत असल्यामुळे आता आमीर खाननं पुढाकार घेऊन निर्मात्यांच्या संघटनेची बैठक बोलावलीय. या बैठकीत आरोप असलेल्या कलाकारांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसंच याबाबत काय कारवाई करता येईल यावरही विचार होतोय. या बैठकीला आमीर खानसह सिद्धार्थ रॉय कपूर आणि इतर प्रॉडक्शन कंपनीचे सीईओदेखील पोहचलेले आहेत.
ज्या कलाकारांवर #MeToo मोहिमेंतर्गत आरोप लावण्यात आलेत त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? याबद्दल 'प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया' या बैठकीदरम्यान निर्णय घेणार आहेत.
दरम्यान #MeToo च्या वादासोबतच आता दिग्दर्शकांमध्येही वाद निर्माण झालेत. दिग्दर्शक विकास बहलनं अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवनेला नोटीस पाठवलीय. ट्विटच्या माध्यमातून आपली बदमानी केल्याचा आरोप बहलने केलाय. त्यामुळे ट्विट मागे घेऊन समाज माध्यमावर माफी मागण्याची मागणीही केलीय. तसंच वक्तव्य मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
मीटू चळवळीअंतर्गत विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. विकास बहलला या संदर्भात माहिती होती आणि त्यानं माफीही मागितल्याचं अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानेनं म्हटलंय. या दोघांनी संधीचा फायदा घेत आपली कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न केल्याचं बहलनं म्हटलंय.