पूरग्रस्तांसाठी आमीर खान आणि लता मंगेशकरही सरसावल्या
आमीर खान आणि लता मंगेशकर यांनीही या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण अशा अनेक भागात महापूराने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी सुरु केला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करण्यासाठी निधी जमा करण्यास यामुळे मदत होत आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकार तसेच काही बॉलिवूड कलाकाराही पुढे सरसावले आहेत. आमीर खान आणि लता मंगेशकर यांनीही या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आमीर खान आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.
पूरग्रस्तांसाठी आमीर खानने २५ लाख आणि लता मंगेशकर यांनी ११ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमीर आणि लता मंगेशकर यांना ट्विट करत त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनेही ५ कोटींची मदत केली. गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांसाठी ५१ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. पुरात घरांचं मोठं नुकसान झालं असून अनेकांचे संसारच उद्धस्त झाले आहेत.