बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुंबई सोडणार आहे. आमिर खान पुढील काही महिने सर्व कामकाज चेन्नईतून करणार असून, तशा हालचाली सुरु केल्या आहेत. आमिर खानची आई झिनत हुसैन आजारी असून त्यांच्यासाठी आमिर खानने हा निर्णय घेतला आहे. आईसाठीच आमिर खान काही महिन्यांसाठी मुंबई सोडून चेन्नईत स्थायिक होणार आहे. आई खूप आजारी असल्याने, या कठीण काळात तिच्यासोबत राहता यावं यासाठी आमिर खानने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानसाठी त्याचं कुटुंब फार महत्त्वाचं असून पुढील दोन महिन्यांसाठी तो तात्पुरता चेन्नईत स्थायिक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या आईची प्रकृती मागील बऱ्याच काळापासून बरी नाही. सूत्रांनुसार, आमिरची आई आजारी असून सध्या चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या कठीण काळात आपण आईसोबत असावं अशी आमिरची इच्छा आहे. यामुळेच आमिरने पुढील दोन महिन्यांसाठी रुग्णालयाजवळच आपला बेस उभारत तिथून काम करण्याचं ठरवलं आहे.


आमिर खानने नुकतीच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, त्यानंतर हे वृत्त समोर आलं आहे. आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटावर काम करत आहे. आमिरने चित्रपटाची घोषणा करताना माहिती दिली की, "मी आता सितारे जमीन पर चित्रपट सुरु करत आहे. या चित्रपटाची निर्मितीही मीच करत आहे. हा चित्रपट 'तारे जमीन पर'चा पुढील भाग असेल. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवलं होतं, आणि हा चित्रपट तुम्हाला हसवेल. 'तारे जमीन पर' चित्रपटात मी दर्शिलला मदत करतो, पण यामध्ये 9 लहान मुलं जे वेगवेगळ्या समस्यांशी लढत आहेत ते मला मदत करतात".


याशिवार आमिर खान सनी देओलच्या 'लाहोर 1947' चित्रपटाचाही भाग आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, आमिर खान निर्माता आहे. "मी, आणि AKP ची संपूर्ण टीम सनी देओल मुख्य भूमिकेत असणाऱ्या आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित, लाहोर, 1947 या शीर्षकाची घोषणा करताना अतिशय उत्साही आणि आनंदी आहोत. आम्ही अत्यंत प्रतिभावान अभिनेता एक सनी देओल आणि आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आम्‍ही जो प्रवास सुरू केला आहे तो सर्वांत समृद्ध होण्‍याचा आहे. तुमचे आशीर्वाद असूद्यात," अशी पोस्ट आमिर खान प्रोडक्शनकडून शेअऱ करण्यात आली होती. 


आमिर खान 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट हॉलिवूडचा कल्ट क्लासिक फॉरेस्ट गम्प चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.