अभिषेक बच्चनची कोरोनावर मात, ट्विट करुन दिली माहिती
अभिषेक बच्चनची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
मुंबई : बच्चन कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन रुग्णालयातून याआधीच डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आज कोरोना टेस्ट निगेटिव्ह (Corona Negative) आल्याची माहिती स्वत: अभिषेक बच्चनने दिली आहे.
अभिषेक बच्चनने ट्विट करुन म्हटलं की, 'वचन म्हणजे वचन. आज दुपारी मी कोविड -१९ नेगेटिव्ह आलो आहे !!! मी सर्वांना सांगितले होते की, मी यावर मात करेल. मी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. मी नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे आभार मानतो. धन्यवाद!'
या ट्विटमध्ये कोरोनावर मात केल्यानंतर अभिषेक बच्चनचा आनंद दिसतो आहे. अभिषेक बच्चनला अजून डिस्चार्ज मिळालेला नाही. डिस्चार्ज कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.