Aayush Sharma Gets Emotional : बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा हा सध्या त्याचा आगामी 'रुस्लान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. तब्बल 3 वर्षांनी आयुष शर्मा हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता आयुष शर्माने त्याचा पदार्पणाचा चित्रपट लवयात्रीबद्दल भाष्य केले. यावेळी आयुष शर्माला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला होता. यावेळी एका ट्रोलर्सने आयुषची तुलना कुत्र्याशी केली होती. आता आयुष शर्माने याच कमेंटबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी तो भावूक झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष शर्मा हा सध्या 'रुस्लान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान आयुषने सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान आयुषला लवयात्री चित्रपटावेळी ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले. सलमान खानला आयुष शर्माच्या ऐवजी एखाद्या कुत्र्याला लाँच करायला हवे होते, अशी कमेंट एका ट्रोलरने यावेळी केली होती.  याबद्दल उत्तर देतेवेळी आयुष शर्मा हा भावूक झाला. माझ्या मुलांनी माझा अभिमान बाळगावा अशी माझी इच्छा आहे. पण हीच कमेंट माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला, असे आयुष शर्माने म्हटले. 


"मला त्या दिवसाने बनवले"


"मी आज जो कोणी आहे, हे मला त्या दिवसाने बनवले आहे. कारण मी आतापर्यंत ज्या गोष्टींचा सामना करत आलो आहे, त्या सर्व गोष्टी ठीक आहेत. पण जेव्हा माझी तुलना एका कुत्र्यासोबत केली गेली, तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला की माझा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि इंटरनेटवर मी कुत्रा आहे अशी कमेंट वाचेल तेव्हा त्याला काय वाटेल, याचा मी विचार केला", असे आयुष शर्माने म्हटले. 


"एका मोठ्या पोर्टलने ती बातमी दिली होती. ती कमेंट वाचल्यानंतर मला धक्का बसला होता. यानंतर मी स्वत:वर अजून मेहनत करेन, असे ठरवले. कारण जेव्हा माझा मुलगा आणि मुलगी मोठे होतील आणि ते माझ्याबद्दल गुगलवर सर्च करतील तेव्हा त्यांना माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी वाचायला मिळायला हव्यात. त्यांना माझा अभिमान वाटायला हवा", असेही आयुष म्हणाला.


"आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो"


"मला त्या ट्रोलरचे आभार मानायचे आहेत. कारण मी आता जो कोणी आहे, तो त्याचमुळे आहे. आता जेव्हा कधी मी स्टंट करायला घाबरतो, तेव्हा मी त्या कमेंटचा विचार करतो आणि पुन्हा जोमाने काम करायला लागतो. कारण माझ्या मुलांनी माझ्याबद्दल चांगलेच वाचावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्यातील हा बदल त्या एका कमेंटमुळे झाला", असेही आयुषने म्हटले. 


दरम्यान आयुष शर्माने लवयात्री या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तो 'अंतिम: द फाइनल ट्रूथ' या चित्रपटात झळकला. यात आयुष शर्मा, सलमान खान आणि महिमा मकवाना हे कलाकर होते. यानंतर आयुष हा 'मांझा', 'पहली पहली बारिश', 'चुम्मा चुम्मा' आणि 'तेरा होके नचदा फिरा' यांसारख्या म्युझिकल अल्बममध्येही झळकला. आता लवकरच तो 'रुस्लान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.