मुंबई : अभिनय आणि दमदार कथानकाच्या बळारवही बॉक्स ऑफिसवर राज्य करता येतं ही 'बाब' अभिनेता आयुष्मान खुराना याने त्याच्या बाला या चित्रपटातून सिद्ध केली आहे. स्त्री या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक अमर कौशिक याने 'बाला'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आणि चित्रपट एका प्रशंसनीय टप्प्यावर नेऊन ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहते आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि आयुष्मानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बाला' या चित्रपटाने पाचव्या दिवशीही कमाईच्या बाबतीतीतील उंचावणाऱ्या आलेखात सातत्य राखलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले. 


सध्याच्या घडीला 'बाला'ची घोडदौड पाहता, येत्या काही दिवसांमध्ये चित्रपट ७५ कोटींच्या कमाईवर पोहोचेल. तर, आतापर्यंत या चित्रपटाने ६१.७३  कोटींची कमाई केली आहे. अमर कौशिकच्या कारकिर्दीतील हा दुसरा सुपरहिट चित्रपट ठरत आहे. 




गुरुनानक जयंतीची सुट्टी, त्यापूर्वीचे सुट्टीचे दोन दिवस पाहता या दिवसांचा चित्रपचाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये फायदा झाला आहे. त्यामुळे आता येत्या काळात आयुष्मानने साकारलेल्या 'बाला'चा गल्ला आणखी किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याच्या कारकिर्दीत या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचं वळण आलं आहे. सलग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांच्या यादीत आयुष्मानचं नाव समाविष्ट झालं असून, तो तरुणांच्या गळ्याती ताईत झाला आहे.