अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा अडचणीत सापडताना दिसत आहे. मंगळवारी 8 ऑक्टोबरला कस्टम विभागाने ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात त्याच्या कार्यलायात छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, एजाज खानच्या कार्यालयातून 35 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यादरम्यान ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. एजाज खानने मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजाज खान स्वत: 2023 मध्ये जामिनावर बाहेर आला होता. पण या छापेमारीनंतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या केसची पाळमुळं युरोपमधून मागवण्यात आलेल्या ड्रग्जशी जोडली जात आहेत. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी काही माहिती दिलेली नाही. 


एजाज खानच्या कार्यालयावर छापा


'मिड-डे'च्या वृत्तानुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंधेरीमधील वीरा देसाई रोडवर असलेल्या कार्यालयावर छापा टाकला. येथून अधिकाऱ्यांनी 100 ग्रॅम MDMA जप्त केलं आहे. या ड्रगची किंमत सुमारे 35 लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. एजाज खानच्या  नातेवाईकाच्या नावावर हे कार्यालय घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


ऑफिसमधील कर्मचाऱ्याला अटक


रिपोर्टमध्ये कऱण्यात आलेल्या दाव्यानुसार, ही प्रॉपर्टी भाड्यावर घेण्यात आली होती. येथे एजाज खानच्या ऑफिसशी संबधित एका व्यक्तीने युरोपमधून ड्रग्ज मागवले. सूरज गौड नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 9 ऑक्टोबरला कोर्टात सादर करण्यात आलं असंही बोललं जात आहे. 


एजाज खान जामिनावर बाहेर


विशेष म्हणजे एजाज खान स्वत: ड्रग्जच्या केसमध्ये अडकला होता. 2021 मध्ये पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्याला अटक केली होती. यानंतर 2023 मध्ये त्याला जामीन मिळाला होता. याआधी 2018 मध्येही त्याच्यावर असे आरोप लागले होते.