नात्यातील मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेत्याला ठोकल्या बेड्या
छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतच्या एका जवळच्या नातेवाईकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं आश्वासन देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. मागील 13 वर्षांपासून बलात्कार करण्यात आल्याचा पीडितेचा दावा आहे. त्याने अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवल्याचंही पीडितेने आरोपात म्हटलं आहे. 29 वर्षीय पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर दुर्ग जिल्ह्याच्या कार्यालयातून त्याला अटक करण्यात आली.
"22 फेब्रुवारीला पीडित मुलीने जुन्या भिलाई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मनोज राजपूत 2011 पासून लग्नाचं आमिष देत आपल्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप तिने केला आहे. यादरम्यान तो तिच्याशी अनैसर्गिक शारिरीक संबंधही ठेवत होता. मुलीने लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने टाळाटाळ सुरु केली होती. यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला," अशी माहिती स्टेशन हाऊस अधिकारी राजकुमार बोरझा यांनी दिली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मनोज राजपूतवर बलात्कार, अनैसर्गिक शारिरीक संबंध, धमकावणं आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यामध्ये पॉक्सोचाही समावेश केला आहे. याचं कारण पीडित मुलीचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात झाली तेव्हा ती अल्पवयीन होती. पण स्थानिक न्यायालयाने पॉक्सो कलम हटवलं आहे.
धक्कादायक म्हणजे पोलीस अटक केल्यानंतर मनोज राजपूतला घेऊन जात असताना त्याने मीडियाला फ्लाइंग किस दिला. आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्याला अडकवलं जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणाला की, "राजेश बिहारी नावाची व्यक्ती मुद्दामून शत्रुत्वाखातर हे करत आहे. ज्या मुलीने माझ्याावर आरोप केले आहेत, ती 11 वर्षं कुठे होती. मला अडकवण्याच्या हेतूने हे सर्व केलं जात आहे".
मनोज राजपूत व्यवसायाने बिल्डर आहे. पण अनेक चित्रपटांच्या निर्मितीतही त्याचा सहभाग आहे. तसंच चित्रपटांची निर्मिती करण्यासह त्यात अभिनयही करतो. गेल्या काही वर्षात त्याच्या उद्योगात वाढ झाली होी. यामुळे त्याची इतरांशी स्पर्धा सुरु झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने आपल्या जीवाला धोका आहे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्याला सुरक्षा दिली जावी अशी त्याची मागणी होती.