`स्वराज्यरक्षक संभाजी` मालिकेतील अभिनेत्याचं निधन
यंदाच्या वर्षी अनेक दिग्गजांच्या जाण्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला.
मुंबई : यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी या कलाविश्वाला कायमचा रामराम ठोकला आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कोरोना किंवा अन्य कारणांमुळे अनेक कलाकारांनी आपले प्राण गमावले आहे. तर नुकताच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रशांतचे निधन झाले. १४ सप्टेंबर रोजी त्याने या जगाचा आणि कला विश्वचा निरोप घेतला.
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्रशांतने अब्दुल्ला दळवी ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या प्रसिद्ध मालिकेशिवाय प्रशांतने ‘स्वराज्यजननी जिजामाता’मालिकेमध्ये बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत देखील त्याने भूमिका साकारली होती.