पडद्यावरचे `व्हिलन` प्रकाश राज या मुलीसाठी आयुष्यभर असतील खरेखुरे `हिरो`
खलनायकी भूमिकांना न्याय देणाऱ्या प्रकाश राज यांच्याकडे...
मुंबई : ए सिंघम... वेलकम टू गोवा सिंघम... असं म्हणत खलनायकी रुपात समोर आलेल्या जयकांत शिक्रे म्हणजेच अभिनेता प्रकाश राज यांनी कमालीची लोकप्रियता मिळवली. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांना न्याय देणाऱ्या प्रकाश राज यांच्याकडे त्यांच्या ठाम भूमिकांसाठीही पाहिलं जातं.
फक्त रुपेरी पडदाच नाही, तर राज हे त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही निर्णयांमुळेही सर्वांच्या मनावर खऱ्या अर्थानं 'राज' करतात.
सध्या त्यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, एक सोशल मीडिया पोस्ट. नवीन मोहम्मदअलीनं ट्विटरवर राज आणि एका मुलीचा फोटो शेअर केला आहे.
श्रीचंदना नावाच्या या गरीब आणि निराधार, मागासवर्गीय मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
सूत्रांच्या माहितीनुसार श्रीचंदना असं या मुलीचं नाव. युकेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. पण, आर्थिक अडचणींमुळे तिला हे स्वप्न साकार करता येणं अशक्य वाटत होतं.
प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेले असतानाही तिला परदेशात जाणं जवळपास कठीण होतं. वडिलांचं छत्र नसलेल्या या मुलीसाठी मग दिग्दर्शक नवीन मोहम्मद पुढे सरसावले.
मुलीची अडचण नीट ऐकून घेतल्यानंतर प्रकाश राज यांनी तिच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय घेतला. या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिथेच तिला नोकरी मिळावी, यासाठीसुद्धा राज यांनी आर्थिक मदत दिली.
एका गरजू मुलीच्या मदतीसाठी प्रकाश राज यांनी सढळ हस्ते केलेली ही मदत एक नवा आदर्श प्रस्थापित करुन गेली. ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने खलनायक नव्हे, सुपरहिरो ठरले.