पुणे : 'काल आम्ही वेळीच प्रयत्न केला नसता तर दोन डोंगर काळे झाले असते.' असं वक्तव्य हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पुण्यातील कात्रज घाटात वणवा लागला होता. तेव्हा तेथील आग अटोक्यात अणण्यासाठी सयाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातील डोंगर परिसरात ही आग लागली होती. सयाजी शिंदे यांचं वृक्षप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'होळीसाठी झाडं तोडू नका, ती केवळ एक अंधश्रद्धा आहे. प्रत्येकानं किमान ५ झाडं तरी लावा. झाडं ७ पिढ्या पुरतात, पण आमदार खासदार पुरत नाहीत' असं भाष्य करत त्यांनी झाडांना महत्त्वाचं स्थान दिलं आहे. लागलेल्या वणव्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



त्याचप्रमाणे सह्याद्रीचा डोंगर हा माझा गॉडफादर असल्याचं देखील ते म्हणाले. 'आमदार, खासदार यांना निधी मिळतो पण झाडांना कोणत्याही प्रकारचा निधी लागत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहवं.' असं देखील ते म्हणाले. 


सरकार किंवा राजकीय पक्षांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे वृक्षलागवडीचा मुद्दा केवळ कागदावरच राहत असल्याचं देखील ते म्हणाले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. सयाजी शिंदे गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड करत आहेत. 


१५ मार्चरोजी पुण्यात होणाऱ्या काटेसावर महोत्सवात ते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ‘ट्री स्टोरी’ फाउंडेशन स्थापन केले असून, त्या माध्यमातून वृक्षप्रेमींना संघटित करून त्यांच्याद्वारे वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचे काम हाती घेतले आहे.