मुंबई : एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुयज डहाके याने एका वादग्रस्त मुद्द्याला वाचा फोडली. ज्यानंतर आता त्यावर कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये असणाऱ्या अभिनेत्री ब्राह्मणच का? असा प्रश्न त्याने या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारला. केसरी या आगामी चित्रपचटाच्या निमित्ताने बोलत असतानाच त्याने या वादग्रस्त मुद्द्याला हात झाला. यावेळी त्याने एका प्रसंगाचा आधार देत आजही अभिनेत्रींच्या जातीचा मुद्दा कशा प्रकारे लक्षात घेतला जातो, ही बाब स्पष्ट केली. एका प्रसिद्ध दागिने विक्रेत्या समुहाच्या  जाहिरातीसमयीचा प्रसंग त्याने सांगितला. 


सुजयची ही मुलाखत माध्यमांमध्ये प्रसारित होताच आणि त्याचं वक्तव्य अनेकांपर्यंत पोहोचताच यावर कलाकारांनी त्यांची मतं मांडली. मालिका विश्वात घराघरात पोहोचलेल्या अभिनेता शशांक केतकर याने  सुजयला खडे बोल सुनवत त्याला एक बोचरा सवालही केला. 


'माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे.  कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास', असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. सोबतच साने आणि मंजुळे हे समीकरण पुरेसं नाहीये का? असा प्रश्न त्याने सुजयला केला. 


'कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे', असं लिहित शशांकने जातीयवादाला कलाविश्वात स्थान नसल्याचीच बाब अधोरेखित केली.




काही मालिकांचं उदाहरण देत ब्राह्मण नसूनही प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या आणि कौशल्याच्या बळावर काम मिळवलेल्या अभिनेत्रींची नावं लिहिली.  कोणतीही वाहिनी जात, धर्म न  पाहता कलाकारांचं कौशल्य पाहूनच त्यांना काम देते अशी ठाम आणि स्पष्ट भूमिका शशांकने मांडली. त्याच्या या पोस्टवर सुजय काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.