मुंबई : 'जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी', असं थेट शब्दांमध्ये लिहित मराठी कलाविश्वातील अभिनेता सौरभ गोखले याने आपली संतप्त आणि हिंसक प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केसरी' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाके याने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान करत कलाविश्वातील जातीयवादाचा मुद्दा अधोरेखित केला. मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये सर्वाधिक अभिनेत्री या ब्राह्मणच असल्याच्या आशयाचा सूर त्याने मुलाखतीत आळवला. ज्यानंतर त्याच्या या वक्तव्यावर तेजश्री प्रधान, शशांक केतकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून डहाकेच्या वक्तव्यावर व्यक्त होणाऱ्यांमध्ये सौरभ गोखलेच्याही नावाचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये त्याने थेट शब्दांमध्ये सुजय डहाकेला सुनावलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनीच कमेंट करण्यास सुरुवात केल्यानंतर सौरभने आणखी एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्याने पुन्हा एकदा आपलं मत मांडलं. 




वाचा : 'माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका; तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस?' 



'डहाके यांच्या बेजबाबदार वक्तव्याने एक मोठे नुकसान होऊ शकते ते म्हणजे ब्राम्हण नसलेले अनेक प्रतिभावान, नवोदित कलाकार या क्षेत्रात येण्याआधीच या गैरसमजातून मागे फिरतील किंवा क्षेत्र बदलतील जे या कलाक्षेत्राला घातक आहे. आता तरीही तुम्हाला हा जातीयवाद पसरवणारे डहाके बरोबर वाटत असतील तर जरूर मला शिव्या देत रहा !', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. कलाविश्वातील सहकाऱ्यांची ही एकंदर भूमिका पाहता आता यावर सुजय डहाकेच्या प्रतिक्रियेकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.