मुंबई : काही वर्षांपूर्वी लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या केदारनाथ या देवस्थानच्या परिसराच निसर्गाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. नैसर्गिक आपत्तीमुळे या श्रद्धास्थळाचं नुकसान झालं खरं. पण, तरीही देवाच्या भक्तीला कशाची भीती, असं म्हणत प्रत्येकाने आपआपल्या परिने योगदान दिलं आणि पुन्हा एकदा केदारनाथची कवाडं भक्तांसाठी खुली झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाप्रलयामुळे झालेलं नुकसान आणि कटू आठवणी या कधीच कोणाच्या मनातून जाणार नाहीत. याच परिस्थितीचा आधार घेत बॉलिवूडमध्ये 'केदारनाथ' हा चित्रपट साकारण्यात आला आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि नवोदित अभिनेत्री सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामागोमाग आता या चित्रपटातील गाणं, 'नमो नमो जी शंकरा' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. युट्यूबवर या गाण्याने अक्षरश: सर्वांना वेड लावलं असून त्याला मिळणारे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढतच आहेत. 


अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला अमित त्रिवेदीने गायलं आहे. सृष्टीचा निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोलेनाथ शंकराची महती या गाण्यातून सांगण्यात आली आहे. शिवाय सुशांत साकारत असलेल्या पात्राची ओळखही या गाण्यातून होत आहे. 



'नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा' हे गाणं ऐकताना पडद्यावर येणाऱ्या दृश्यांच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटांमध्येच केदारनाथ धामची यात्रा अनुभवण्याची संधीही प्रेक्षकांना मिळत आहे. निसर्गाचे रंग, श्रद्दा आणि सकारात्मक वातावरण या साऱ्याची सुरेख सांगड असणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव  घेतंय हे खरं.