Ravi Kishan Mother Photo: रवी किशनच्या वयोवृद्ध आईने कॅन्सरलाही नमवलं; ही प्रेरणादायी कहाणी पाहाच
तिथं त्यांच्या आईनं मात्र आपल्या या लेकाला आपल्या सकारात्मकतेनं धीर दिला.
मुंबई : भाजप नेता आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) गेल्या काही काळापासून बऱ्याच कठीण प्रसंगातून जाताना दिसत आहे. नुकतच या अभिनेत्यानं त्याच्या भावाला गमावलं आणि त्यानंतर आईला कॅन्सरसारख्या आजारानं गाठलं आणि त्यांच्यावर आणखी एक आघात झाला. पण, जिथं रवी किशनच या बातमीनं खचले तिथं त्यांच्या आईनं मात्र आपल्या या लेकाला आपल्या सकारात्मकतेनं धीर दिला.
कॅन्सरला पायाखाली टिच्चून त्यांची आई. महिन्याभरानंतर रवी किशन यांची आई आता घरी परतली आहे. सोशल मीडियावर त्यांनी आईसोबतचा एक फोटो शेअर करत तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभारही मानले आहेत.
'टाटा कॅन्सर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर पंकज चतुर्वेदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. आई, घरी परतलीये... तुम्ही सर्वांनीच तिला बरं करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली... ' असं लिहित त्यांनी आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला.
या फोटोमध्ये आई, रवी किशन यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहे. आजच्या दिवसातील सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा सर्वात उत्तम आणि सकारात्मक फोटो आहे, असं म्हणायला हरकत नाही.
साधारण महिन्याभरापूर्वीच रवी किशन यांनी एक ट्विट करत आपल्या आयुष्यात एकामागून एक येणाऱ्या वादळांविषयी ट्विट केलं होतं. खासगी आयुष्यात झालेल्या या हानीबद्दल सांगताना आपल्या आईला कॅन्सरनं गाठल्याचं सांगत जगण्याचं प्रत्यक्ष चित्र सर्वांसमोर ठेवलं होतं.
रवी किशन यांनी ज्या क्षणाला ही पोस्ट केली, त्या क्षणाला त्यांना दिलासा देत बऱ्याच कलाकारांनी मोलाची भूमिका बजावली होती. योग्य वेळचं निदान आणि त्यानंतर मिळालेले योग्य उपचार या साऱ्याच्या बळावर रवी किशन यांच्या आईला अगदी सहजपणे कॅन्सरमधून सावरणं शक्य झालं.
लहानसहान आजारांना घाबरणारे आपण किंवा आपल्यासारखे अनेकजण रवी किशन यांच्या आईनं जिंकलेला हा संघर्ष पाहून प्रेरित होताना दिसत आहेत.