मुंबई : एखाद्या सहलीला गेलं, किंवा रात्री उशिरा गप्पा मारायला बसलं की आपल्यातील कोणीतरी, 'ए भूताच्या गोष्टी सांग ना.., तू कधी पाहिलंय का'? असा प्रश्न हमखास करतं. त्याला 'ए भूतबित काही नसतं...' असं प्रत्युत्तरही त्यावर मिळतंच मिळतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कितीही नाकारलं तरी या गोष्टी मानणारे आणि न मानणारे असे दोन गट आपण आजवर पाहिले असतील. सध्या एका अभिनेत्यानं त्याला आलेला असाच अनुभव शेअर केला. 


लक्षपूर्वक ऐकावा असाच हा अनुभव. यातून कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही. किंबहुना तशी इच्छाही नाही. पण, जर हे ऐकून तुम्ही घाबरलात तर जबाबदारी सर्वस्वी तुमची. 


आपल्याला भूत दिसलं की आणखी काही, ठाऊक नाही पण तो प्रसंग धडकी भरवणारा होता, असं सांगणारा हा अभिनेता आहे विराजस कुलकर्णी. (Virajas kulkarni)


विराजसनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, 'प्रॅक्टिस संपल्यावर माझा मित्र मीहिर मला दुचाकीनं घरी सोडत होता. 


आणि पूल चढत असताना मला असा भास झाला की, पांढरी टोपी - लेंगा घातलेला एक माणूस सायकल ओढत आमच्या मध्ये आला. मला तो भास झाला आणि मी मिहीरला गचकन पकडलं. 


त्यानेही जोरात ब्रेक मारला आणि आम्ही थांबलो. तो भास होता. त्यालाही ते कळलं. सॉरी म्हणणार इतक्यातच तो मला सॉरी म्हणाला. कोणीतरी सायकल घेऊन मध्ये आल्याचा मला भास झाल्याचं तो मित्रही म्हणाला. 


भास म्हणजे... विचारताच. पांढरी टोपी, लेंगा घातलेला माणून असं तो म्हणाला आणि हे ऐकल्यावर माझी तंथरली. लगेच घरी चल इथं थांबायला नको असं मी त्याला म्हणालो... '



विराजसचा हा अनुभव एका प्रमोशन तंत्राचा भाग असला तरीही त्याचे शब्द आणि तो प्रसंग मात्र खरा होता हेच त्याचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. 


तुम्ही असं काही अनुभवलंय का ? 


(झी 24 तास अशा कोणत्याही प्रसंग किंवा समजुतींना दुजोरा देत नाही.)