मुंबई : अभिनेता संजय दत्त sanjay dutt गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पानिपत' panipat या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. विविध कार्यक्रम, चर्चासत्र अशा ठिकाणी उपस्थिती लावत त्याने या चित्रपटाची प्रसिद्धी केली. अशा या चित्रपटाच्याच प्रसिद्धीच्या निमित्ताने संजूबाबा विनोदवीर कपिल शर्मा याच्या 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात पोहोचला होता. ज्याचा प्रोमो सध्या काही चर्चांना आणि वादांना वाव देणारा ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट पाहता येत आहे, की कपिलने 'संजू' या चित्रपटातील एका दृश्याचा संदर्भ देत संजय दत्तच्या खासगी आयुष्याविषयी एक प्रश्न केला. ज्यामध्ये त्याच्या अनेक प्रेयसींचा विषय चाळवला गेला. इथे अनेक प्रेयसी म्हणण्याचं कारण म्हणजे संजय दत्तने स्वत: आपल्या ३००हून जास्त प्रेयसी होत्या या गोष्टीला दुजोरा देत हा आकडा वाढेल असं म्हणत कोपरखळी मारली. त्यावर प्रेक्षक आणि कपिल शर्माला हसू आवरलं नाही. 



विनोदी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेला कार्यक्रमाचा हा प्रोमो मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीला पटलेला नाही. सोशल मीडियावर तिने नाव न घेता याविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिपनिता शर्मा. 



'एक अभिनेता कार्यक्रमात त्याच्या आगामी चित्रपटाची प्रसिद्ध करतो. यावेळी तो त्याच्या ३००हून अधिक प्रेयसींविषयी बोलतो. बरं, प्रेक्षक आणि सूत्रसंचालक यावर हसतातही. एखाद्या महिलेने कार्यक्रमात जाहीरणे ही बाब सांगितली तर? मजामस्करीतच ती असं म्हणाली तर? हा लिंगभेदच अनेकदा चुकतो आणि दुष्कृत्यांचं, वाईटांचं मूळ ठरतो', असं ट्विट तिने केलं. 


संजय दत्त याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर आणि जीवनातील काही प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या 'संजू' या चित्रपटातून त्याच्या खासगी जीवनावरही कटाक्ष टाकण्यात आला होता. ज्यामध्ये त्याला एकूण ३०८ प्रेयसी होत्या असा उल्लेख होता. चित्रपटातील या एका दृश्याने अनेकांच्याच भुवयाही उंचावल्या होत्या.