मुंबई : टेलिव्हिजन विश्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून वादात अडकली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बोले चूडिया' चित्रपटातून मौनी रॉयला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मौनीवर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आहेत. त्यामुळे आता करियरच्या सुरुवातीच्या काळातच मौनीला समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बोले चूडिया' चित्रपटाचे निर्माते राजेश भाटिया यांनी, मौनी आता चित्रपटाचा भाग नसून चित्रपटासाठी आपण दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचं सांगितलं आहे. 'बोले चूडिया'च्या तारखा नक्की झाल्यानंतर, त्या तारखा मौनी कोणत्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी देत होती. चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये ती हस्तक्षेप करत होती. ती अतिशय अनप्रोफेशनल वागत होती. ती केवळ वर्कशॉप आणि चित्रपटाच्या वाचनासाठी जेमतेम येत होती आणि त्यामुळेच आमच्याकडे अभिनेत्री बदलण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं' त्यांनी सांगितलं.


मौनीने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिच्या प्रवक्ताने, निर्मात्यांनी लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. मौनीच्या प्रवक्त्याने, मौनीवर बेजबाबदारपणाचे लावलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय. 'मौनीने याआधीही चित्रपट केले आहेत. तिने सर्वांशी प्रोफेशनलरित्या व्यवहार केले आहेत. आमच्याकडे अनेक मेल आणि मेसेजेस आहेत. या मेल, मेसेजमधून मौनीवर लावलेले आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध होऊ शकतं. आम्हाला ते मेल, मेसेज दाखवण्यासाठी कोणतीही समस्या नाही. याबाबत आणखी काही बोलायचं नसल्याचं' त्याने म्हटलंय. 



नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून प्रमुख भूमिकाही साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही जाहीर करण्यात आला होता.



आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात मौनी भूमिका साकारणार आहे. वर्षाच्या अखेरीस 20 डिसेंबर रोजी 'ब्रम्हास्त्र' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय 'मेड इन चाइना'या चित्रपटातही मौनी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि मौनी स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट 30 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.