मुंबई: 1970 च्या काळात अनेक अभिनेत्री या लोकप्रियेतेच्या शिखरावर होत्या. आज पन्नास वर्षांनंतरही या हिरोइन्सची जादू कायम आहे. त्यातीलच एक आहेत मुमताज या दिग्गज अभिनेत्री. आज मुमताज यांचा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्ताने जाणून घेऊया मुमताज आणि अमिताभ बच्चन यांचा एक गमतीदार किस्सा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅले आर्टिस्ट म्हणून मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची इनिंग सुरू केली. मुमताज यांना पहिला हिट चित्रपट मिळाल्यानंतर त्यांच्या करिअरला वेगाने सुरुवात झाली. त्यानंतर त्या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या. एवढेच नाही तर शतकाचे नायक असलेल्या अमिताभ बच्चन यांना त्यांनी तर चक्क आपली एक मर्सिडीज कारही भेट दिली होती.


1973 मध्ये मुमताज यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात काम केले होते. तेव्हा अमिताभ बच्चन इंडस्ट्रीत नवीन होते. त्या काळातही मुमताज मर्सिडीज कार घेऊन सेटवर यायच्या. त्यावेळी मुमताज या एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांच्याकडे इतकी महागडी गाडी होती. त्याचवेळेला बिग बी साध्याशा कारमधून सेटवर यायचे. 


एके दिवशी अमिताभ यांनी सेटवर त्यांच्यासोबत बसलेल्या लोकांना सांगितले की एक दिवस त्यांच्याकडेही मर्सिडीज येणार. सगळ्यांसमोर त्यांनी आपले हे स्वप्न व्यक्त केले होते. अमिताभ यांना मर्सिडीजसारखी कार हवी आहे हे मुमताज यांना समजल्यावर त्यांनी त्यांची मर्सिडीज अमिताभ यांना भेट दिली. शूटिंग संपल्यानंतर मुमताज अमिताभ यांच्या कारने घरी गेल्या तर त्यांच्या मर्सिडीजची चावी त्या अमिताभ यांच्या चावीच्या जागी ठेवून गेल्या. याचे अमिताभ यांना आश्चर्य वाटले कारण आपली इतकी महागडी गाडी त्यांनी चक्क आपल्या सहकलाकाराला इतक्या सहजपणे भेट म्हणून देऊ केली होती. 



ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मुमताज यांचे आई-वडील इराणचे रहिवासी होते. मुमताज यांच्या जन्माच्या एका वर्षानंतर त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. गरिबीमुळे मुमताज आणि त्यांच्या बहिणीने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. मुमताज यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. असे म्हटले जाते की सुरुवातीच्या काळात त्या त्यांची धाकटी बहीण मल्लिकासोबत स्टुडिओत फिरायच्या आणि कोणत्याही छोट्याशा भूमिकेसाठी त्या काम करायच्या. मुमताज यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टंट एक्ट्रेस म्हणून केली होती.