तब्बल 16 वर्षांनी नीना गुप्तांनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या `माझ्या...`
नीना गुप्ता यांनी तब्बल 16 वर्षांनी लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.
Neena gupta wedding picture : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून नीना गुप्ता यांना ओळखले जाते. नीना गुप्ता या त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्या अनेकदा त्यांचे पती विवेक मेहरा यांच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या नीना गुप्ता या त्यांच्या लग्नाच्या फोटोमुळे चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांनी तब्बल 16 वर्षांनी लग्नातील फोटो पोस्ट केला आहे.
नीना गुप्ता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्या इन्स्टाग्रामवर सतत जुने आणि नवे फोटो पोस्ट करताना दिसतात. नुकतंच नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या लग्नातील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांचे लग्न किती साधेपणाने पार पडले होते, हे पाहायला मिळत आहे. नीना गुप्ता आणि त्यांचे पती विवेक मेहरा यांनी अमेरिकेत लग्नगाठ बांधली. यावेळी नीना गुप्ता यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर विवेक यांनी चॉकलेटी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे.
"माझ्या साध्या लग्नाचा फोटो"
या लग्नात मसाबा गुप्ताही दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती हातात छत्री घेऊन नीना व विवेक यांच्या मागे उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्यासमोर एक टेबल दिसत असून त्यावर एक तांब्या दिसत आहे. त्यासोबतच लग्न करणारे भटजीही यात पाहायला मिळत आहे. नीना गुप्तांनी हा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. माझ्या साध्या लग्नाचा फोटो, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहते यावर कमेंट करतानाही दिसत आहेत.
दरम्यान नीना गुप्ता यांनी काही महिन्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत विवेक मेहरासोबतची लव्हस्टोरी सांगितली होती. यावेळी त्या म्हणाल्या, माझा विमानांशी काही खास संबंध नाही. मी विवेकला विमान प्रवासादरम्यान भेटले. तो काळ खरंच खूप चांगला होता. तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होते. पण मी त्यातून बाहेर पडले, असे त्यांनी म्हटले. नीना गुप्ता आणि विवेक मेहरा यांनी 2008 मध्ये अमेरिकेत लग्नगाठ बांधली.
विवेक मेहराशी लग्न करण्यापूर्वी नीना गुप्ता वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्याच काळात त्या गरोदर राहिल्या. पण नीना यांनी लग्न न करताच बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असून ती आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे.