मुंबई : कलाकारांच्या खासगी जीवनात वादळ आल्यानंतर बऱ्याच चर्चांना फाटे फुटतात. या चर्चा अनेकदा त्या कलाकारांच्या जखमांच्या वेदना आणखी तीव्र करणाऱ्या ठरतात. कित्येकदा कॅमेरासमोर हसऱ्या चेहऱ्याच्या बऱ्याच सेलिब्रिटींच्या मनात मात्र, सांगताही येणार नाही इतकं दु:ख लपलेलं असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एका अभिनेत्रीनं नुकतंच तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.


पहिल्या लग्नातून मिळालेली घटस्फोटाची वेदना असो. किंवा मग रिलेशनशिपमध्येही मिळालेलं अपयश असो. प्रेमाच्या बाबतीत या अभिनेत्रीला कायम निराशाच नशिबी आली.


ही अभिनेत्री आहे रश्मी देसाई. ‘बिग बॉस 15’ मध्ये रश्मी तिच्या पहिल्या लग्नाच्या मुद्दयावरुन बरीच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.


रश्मी ज्यावेळी 13 पर्वात सहभागी झाली होती, तेव्हा तिथं तिचा प्रियकर अरहान खानही बिग बॉसच्या घरात आला होता. त्यावेळी रश्मीच्या जीवनात मोठं वादळ आलं होतं.


अरहानचं पहिलं लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलही आहे असा खुलासा जेव्हा सलमाननं केला होता तेव्हा रश्मीच काय, सर्वांनाच धक्का बसला होता.


पुढे झाल्या प्रकारानंतर रश्मीनं अरहानशी असणारी सर्व नाती तोडली.


आता याच रिऍलिटी शोमध्ये जेव्हा राखीनं रश्मीच्या घटस्फोटाचं कारण विचारलं तेव्हा आपल्याला या मुद्द्यावर बोलायचं नाहीये, असंच रश्मीनं सांगितलं.


आपण यावर बोलण्यावर विश्वासच ठेवत नाही, कारण हे सारं त्या दुसऱ्य. व्यक्तीच्या (नंदिश संधू)जीवनावरही परिणाम करु शकतं असं कारण रश्मीनं दिलं.


सध्या आम्ही दोघंही चांगल्या ठिकाणी आहोत आणि मला नाही वाटत की आता आयुष्यात अस्थैर्य यावं. ज्या गोष्टी जीवनावर नकारात्मक परिणाम करती त्यांची चर्चा करण्याची इच्छाच नाही असं रश्मी म्हणाली.


आपल्या खासगी आयुष्याविषयी बिग बॉसच्या घरात होणारी चर्चा आणि एकंदरच पहिल्या लग्नाबाबतची चर्चा ऐकून मन सुन्न होतं, असं म्हणत रश्मी हुंदके देत रडू लागली.


नंदिशबाबत कोणता मुद्दा समोर येतो तेव्हा मी स्वत:वरचा ताबा हरवते आणि मला भीती वाटू लागते, एक विचारही हादरवून जातो असं ती म्हणाली.


‘हा एक असा विषय आहे जो मला कायम दु:खी करुन जातो. त्याचा विषय येताच मी भान हरपते. जेव्हा कोणीही त्या आठवणी काढतं तेव्हाही भीती वाटते’, असं म्हणत मनातील भावनांना तिनं अश्रूंवाटे मोकळं केलं.


वैयक्तिक जीवनातील घटना एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे कोलमडून टाकतात, याचच वेदनादायक उदाहरण रश्मीकडे पाहताना मिळालं.