मुंबई : हिंदी चित्रपट आणि वेब सीरिज जगतात आपलं नाव कमवणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि त्यांचे पती, अभिनेते आशुतोष राणा यांच्या नात्याला आता एक नवं वळण मिळालं आहे. आदर्श जोडी, म्हणून अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे आता एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘क्राइम पेट्रोल सतर्क : गुमराह बचपन’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा या दोघांवर सोपवण्यात आली आहे. प्रेक्षकांपुढं काही घटना हे दोघंही पोहोचवणार आहेत. सोबतच मुलांच्या पालकांना सतर्क करणारे अनेक मुद्देही ते यादरम्यान मांडताना दिसणार आहेत. 


अतिशय कमी वयातच मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कशी ओढली जातात यावर भाष्य करताना रेणुका शहाणे परिस्थिती प्रेक्षकांपुढे मांडणार आहेत. लहान मुलांच्या पालकांसाठी कार्यक्रमाचा हा टप्पा बऱ्याच मार्गांनी मदतीचा ठरणार आहे. 


रेणुका शहाणे यांनी या कार्यक्रमाचा भाग होण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम फक्त समाजाला शिकवण द्यायलाच मदत करत नाहीत, तर नागरिकांना त्यांच्या आजुबाजूच्या परिस्थितीबाबतही सतर्क करतात असं मत त्यांनी मांडलं. एक आई आणि सूत्रसंचालिका होण्याच्या नात्यानं ही महत्त्वाची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 


कार्यक्रमाच्या काही भागांमध्येच रेणुका शहाणे त्यांचे पती, आशुतोष राणा यांच्यासोबत दिसणार आहेत. पण, तरीही ही जोडी एका नव्या धाटणीच्या कार्यक्रमातून दिसणार असल्यामुळं चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.