Bol Bol Rani : सई ताम्हणकर, सुबोध  भावे आणि चिन्मय मांडलेकर 15 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील निर्माते अमित भानुशाली आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. लवकरच ते 'बोल बोल राणी' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच 7 फेब्रुवारी 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिद्धार्थ विंचुरकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 


मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझिलंड मोशन पिक्चर्सचे सिद्धार्थ विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


काय म्हणाले सिद्धार्थ विंचुरकर?


मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहेत. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असून ते जगभरातील प्रेक्षकांना आवडत आहेत. मी परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो. त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपट निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे. म्हणूनच मी भारतात आलो.  मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार, हे ठरवलेच होते. लवकरच 'बोल बोल राणी' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत. मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी. 


माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका


सई ताम्हणकर म्हणते, माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. परंतु, टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या करू शकलो. अपूर्वा आणि मी 'दुनियादारी'पासून एकत्र आहोत. ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिद्धार्थ बरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. 


आणखी दोन चित्रपटांची घोषणा होणार


सई ताम्हणकर, सुबोध  भावे आणि चिन्मय मांडलेकर यांचा 'बोल बोल राणी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच आता न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार, हे नक्की !