Divorce प्रकरणी समंथाचा आणखी एक मोठा निर्णय; पुन्हा न्यायालयात धाव
समंथा न्यायालयात का गेली?
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या जीवनाच्या कठीम वळणावरुन जात आहे. काही दिवसांपूर्वीत समंथा आणि तिचा पती, अभिनेता नागा चैतन्य यांच्या नात्याला तडा गेला. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या दोघांनीही त्यांच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याची अधिकृत माहिती दिली. मुख्य म्हणजे समुपदेशनानंतरही हे नातं पूर्वपदावर आलं नाही. (samantha ruth prabhu naga chaitanya)
नात्यात दुरावा आल्यानंतर समंथानं कोट्यवधींची पोटगीही नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, आता म्हणे तिनं पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. घटस्फोट आणि वैयक्तिक जीवनाबाबत तर्कवितर्क लावत माहिती प्रसिद्ध करणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सविरोधात आता समंता उभी ठाकली आहे. या सर्व युट्यूब चॅनल्सविरोधात तिनं अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.
सुमन टीव्ही, तेलुगू पॉप्युलर टीव्ही आणि इतरही काही युट्यूब चॅनल्सचा समावेश आहे. या चॅनल्सना समंथाच्या नावे नोटीस मिळणार असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. समंथानं व्यंकट राव या वकिलांविरोधातही कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी समंथाच्या वैवाहिक जीवनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत तिची प्रेमप्रकरणं असल्याचं म्हटलं होतं.
घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्याबाबत खुप काही बोललं जात आहे. अनेकांनीच या साऱ्यासाठी समंथाला निशाण्यावर घेत तिच्याबाबत बऱ्याच टीप्पणीही केल्या आहेत. पण, आपल्या खासगी जीवनावर होणारी चिखलफेक पाहता आता समंथा शांत राहणार नसून, या साऱ्यांच्याच विरोधात उभी ठाकली आहे.